कर्जत | देशाच्या स्वातंत्र्य समरात सहभागी होऊन आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा विठ्ठलराव तथा भाई कोतवाल यांचे घर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही राष्ट्रीय स्मारक बनले नाही. भाई कोतवाल यांच्या घराची स्थिती नाजूक असून त्या ऐतिहासिक घराचा एक भाग कोसळला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शासनानेदेखील हुतात्मा भाई कोतवाल यांचे घर राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी एक कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती, मात्र अद्याप ती घोषणाच राहिली आहे.
माथेरानमध्ये १९३५ च्या दरम्यान देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडण्यासाठी भाऊसाहेब राऊत यांच्या पुढाकाराने जमवाजमव सुरू झाली. त्याकाळी माथेरानमधील १८ तरुण ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढायला तयार झाले. त्यात विठ्ठल कोतवाल होते. आपल्या जनतेला आर्थिक मदत व्हावी यासाठी माथेरान नागरी पतसंस्था स्थापन केली.
याच काही मंडळींनी माथेरान नगरपरिषदेची निवडणूक देखील लढवली आणि अध्यक्ष उपाध्यक्ष होऊन ब्रिटिशांचे लांगुनचालन करणार्यांना हादरा दिला. माथेरान पालिकेचे उपनगराध्यक्ष राहिलेल्या भाई कोतवाल यांनी गरिबांसाठी कर्जत कोर्टात मोफत वकिली देखील केली. त्यात कर्जत तालुक्यात १९४२ मध्ये ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. त्यात मुंबईला वीजपुरवठा करणारे विजेचे पायलन कापणे, टेलिफोन चे तारा तोडणे, पोलीस ठाणे उद्ध्वस्त करणे आदी कामे भाई कोतवाल यांची टोळी करायची.
याच माथेरानचे सुपुत्राला ब्रिटिशांविरुद्ध लढताना दोन जानेवारी १९४३ मध्ये हुतात्मा व्हावे लागले. याच हुतात्मा भाई कोतवाल यांच्या कुटुंबाची वाताहत झाली आणि आज त्यांचा रक्ताचा कोणी राहिला नाही. मात्र त्यानंतरही माथेरान मधील घोडके आळीमध्ये असलेले घर अनेक समस्यांनी व्यापलेले आहे. राष्ट्र निर्मितीमधील महत्वाचे केंद्र राहिलेले हुतात्मा भाई कोतवाल यांचे घर चारही बाजूंनी अडचणीत आहे. त्या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत.
१५ वर्षांपूर्वी या घराची दुरुस्ती व्हावी आणि घरामध्ये राहत असलेले भाडेकरू यांना बाहेर काढण्यासाठी सुधागड बलिदान दिनी जोरदार आवाज उठविण्यात आला होता. त्यावेळी घराची दुरुस्ती करून देण्यात कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल प्रेमी यांना यश आले होते. मात्र आजही घराच्या अनेक भागात भाडेकरू राहून आहेत. त्यांना बाहेर काढणे कोणाला जमत नाही आणि त्या घराचे राष्ट्रीय स्मारक करणे कठीण झाले आहे.
हुतात्मा भाई कोतवाल यांच्या घराची स्थिती त्यांच्या ११२ व्या जयंतीचे दिवशी पुन्हा एकदा समोर आली. घराची एका बाजूने पडझड झाली असून त्याच भागात भाडेकरू यांना घर ताब्यात ठेवले आहे, तसेच कोतवाल कुटुंबातील सदस्य राहत असलेल्या भागातील छपराची पावसाळ्यात आलेल्या वादळात मोडून गेली आहेत.
हुतात्मा भाई कोतवाल यांना १०१ वी जयंती साजरी होत असताना माथेरान नगरपरिषद हद्दीमधील घराचे स्मारक करण्यात यावे अशी मागणी होती. यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या अर्थ संकल्पात एक कोटींचा निधी देण्याचे तत्कालीन अर्थ मंत्री अजित पवार यांनी २०१३ मध्ये अर्थसंकल्प जाहीर करताना घोषणा केली होती. मात्र हा निधी दहा वर्षे लोटली तरी माथेरान नगरपरिषदेकडे आलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने केवळ घोषणा केली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.