देवाभाऊ...शेवटी आलेच ! आज मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ!

05 Dec 2024 12:47:27
MUMBAI
 
मुंबई | नव्या सरकारचा नवा नायक कोण होणार? याची चर्चा गेले दहा बारा दिवस रंगली होती. शिंदे कीफडणवीस? कोण होणार मुख्यमंत्री? या प्रश्नाचे उत्तर बुधवारी मिळाले. भाजपने गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर पुढचे मुख्यमंत्री तेच होणार, हे नक्की झाले आहे. गुरुवारी (५ डिसेंबर) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
 
दोन उपमुख्यमंत्रीदेखील यावेळी शपथ घेणार आहेत.विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर गेल्या जवळपास आठ दिवसांपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. बुधवारी गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी एकमताने निवड केली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.
 
MUMBAI
 
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह काही राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांचे आणि जनतेचे आभार मानले. तसेच आमदारांना संबोधित करत असताना एक है तो सेफ है असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
"सर्वप्रथम मी सर्व आमदारांचे आभार मानतो. सर्व आमदारांनी एकमताने माझी गटनेतेपदी निवड केली. खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की या वेळची निवडणूक ही ऐतिहासिक राहिली. या निवडणुकीने आपल्या समोर एक गोष्ट ठेवली. ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है.
 
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरु झाली. महाराष्ट्राने जे बहुमत आपल्याला दिले. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. खरे म्हणजे आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, त्यांचेही मी आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
"एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा पंतप्रधान मोदींनी बसवले. अर्थात एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मान दिला. त्यामुळे मी नरेंद्र मोदी पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचेही आभार मानतो”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाल्यानंतर कर्जतमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी आमदार सुरेश लाड, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, शरद लाड, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, तानाजी चव्हाण, शहर अध्यक्ष विजय जिनगरे, शर्वरी कांबळे, अ‍ॅड. गायत्री परांजपे, स्नेहा गोगटे, राजा बांदल, शिरीष कदम उपस्थित होते.
 
पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला.
 
Powered By Sangraha 9.0