कोंढेपंचतन धरणाची साठवण क्षमता वाढवणे गरजेच , गाळ साचल्याने पाणीसाठवण क्षेत्रावर परिणाम

05 Dec 2024 18:43:32
 borli
 
बोर्लीपंचतन । श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागामार्फत कोंढेपंचतन येथे बांधण्यात आलेले बंधारावजा धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे जून ते नोव्हेंबर या कालावधीत परिसराला पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर डिसेंबरपासून पावसाळा सुरु होईपर्यंत लघुपाटबंधारे विभागाच्या कार्ले धरणातून गावाची तहान भागवली जाते.
 
मात्र कोंढेपंचतन धरणाची रुंदी वाढविल्यास जादा पाणी साठा जमा होऊन त्याचा लाभ बोर्लीपंचतनकरांना होऊ शकतो.1995 साली युती शासनाच्या कार्यकाळात झालेल्या या धरणाचे कार्यक्षेत्र अतिशय नैसर्गिक व पूर्णपणे माती, दगड गोट्यांच्या डोंगरातील आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र लहान असून पावसाळ्यात धरणात पाणी जमा होताना पाण्याबरोबर माती, दगड मोठ्या प्रमाणात वाहून येतात. त्याचा परिणाम पाणी साठ्यावर होत असून उभारणी केल्यापासून धरणातला गाळ काढला नसल्याने दरवर्षी पाणीसाठवण क्षेत्र कमी होत आहे.
 
या धरणाच्या पाणलोट क्षेत्राची रुंदी वाढवून त्यातील गाळ, दगड, गोटे, माती काढल्यास पाण्याची साठवण क्षमता किती वाढवता येईल? आताची साठवण क्षमता आणि पाणलोट क्षेत्राची रुंदी वाढविल्यानंतर वाढीव पाण्याचा दाब बंधारा पेलवू शकेल का? या तांत्रिक बाबींंची तपासणी करणे आवश्यक आहे. बोर्लीपंचतन गावाची वाढती लोकसंख्या व वेगाने होणारा विस्तार पाहता पाणी साठवण क्षेत्राची रुंदी वाढविल्यास जादा जमा झालेल्या पाण्यामुळे आणखी दीड- दोन महिने तरी पाणीपुरवठा वाढू शकेल.
 
याचा सकारात्मक परिणाम लघुपाटबंधारे विभागाच्या कार्ले धरणावर होऊन तेथील थोडाफार पाणीसाठा राखीव राहून दिवसेंदिवस पावसाच्या कमी होत असलेल्या प्रमाणामुळे त्याचा वापर  ऐनवेळी पाणीटंचाईच्या काळात होऊ शकतो. त्याचबरोबर बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीच्या दोन तीन महिन्यांच्या वीज बिलाच्या खर्चाचीसुध्दा बचत होऊ शकते. ‘जलजीवन मिशन’ आणि ‘हर घर जल से नल’ या शासनाच्या योजना प्रगतीपथावर असल्या तरी ज्या धरणांतून या योजना राबविल्या जातात.
 
त्या धरणांतील पाणीसाठा कसा वाढवता येईल यासाठीसुध्दा प्रयत्न होणे गरजेचे आहे. सुमारे तीस वर्षांनंतरही कोंढे धरणाच्या बंधार्‍याचे बांधकाम सुस्थितीत असून या सर्व गोष्टींचा भविष्याच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानांतर्गत या धरणावर पाणलोट क्षेत्र विकास योजना राबविण्यासाठी बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीकडून संबंधीत विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवून, पावसाळ्यापूर्वी कोंढेपंचतन धरणातील गाळ काढण्याबरोबरच शक्य होत असेल तर पाणलोट क्षेत्राची रुंदी वाढवून धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढवता येईल का? याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. 
 
Powered By Sangraha 9.0