पोलादपूर भूमिअभिलेख भवनच्या भिंतींना तड , अभिलेखांचीही जीर्णावस्था ; कायमस्वरुपी उपअधिक्षक नसल्याने कामकाजावर परिणाम

06 Dec 2024 13:45:40

Poladpur
 
पोलादपूर । पोलादपूर तालुका भूमिअभिलेख भवन इमारतीची प्रचंड दूरवस्था झाली असून, या इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची गरज आहे. तर दुसरीकडे या कार्यालयातील अभिलेखांची जीर्णावस्थाही चिंतेचा विषय बनली आहे. कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून कायमस्वरूपी नेमणुकीचे उपअधिक्षक नसल्याने कामकाजावर दुष्परिणाम होत आले.
 
25 व 26 जुलै 2005 च्या अतिवृष्टी काळात पोलादपूरच्या शासकीय धान्य गोदामात सुमारे साडेतीन टनाहून अधिक गहू आणि तांदूळ भिजल्यामुळे कुजून गेला आणित्याची विल्हेवाट लावताना जनतेमध्ये धान्याच्या नासाडीची चर्चा होऊ नये यासाठी तहसिल कार्यालयामागील भागात हे सडलेले धान्य उघडयावर टाकून त्यावर माती टाकण्यात आली. साधारणत: तीन वर्षांनंतर येथे भूमिअभिलेख भवन कार्यालयाची इमारत बांधण्यास मंजूरी मिळाली आणि आरसीसी पध्दतीचे बांधकाम करून 2009 साली ही इमारत उभारण्यात आली.
 
14 वर्षांपासून या इमारतीमध्ये सिटीसर्व्हे ऑफिस कार्यरत झाले असून इमारतीच्या भिंतींना तडे जाऊ लागले. आधीच मोडकळीस आलेली भूमिअभिलेख भवनाची ही इमारत केवळ तडे बुजवून रंगकाम करण्यात आल्याने भयावह स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. इमारतीबाहेर बांधलेल्या पायर्‍या आणि व्हरांडाच खचत चालला असून, इमारतीच्या भिंतींना तडे जाऊ लागल्याने कर्मचारी भितीच्या सावटाखाली वावरत काम करत आहेत.
 
यामुळे इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करण्यात येऊन नव्याने बांधकाम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. भूमिअभिलेख भवनाच्या या इमारतीची दूरवस्था सुरूअसताना कार्यालयाच्या अभिलेखांवरही हवेतील आर्द्रतेमुळे परिणाम झालेला दिसून येत आहे. हे अभिलेख जतन करणे कर्मचार्‍यांसाठी जिकरीचे झाले आहे. या अभिलेखांचे जतन करण्यासाठी लॅमिलेशन आणि बायडींगचे काम शासनाने तातडीने हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
तालुका भूमिअभिलेख उपअधिक्षक अधिकारी पदावर श्रीवर्धन येथील मोरे हे प्रभारी कामकाज पाहत आहेत. कायमस्वरुपी उपअधिक्षक नसल्याने खातेदार तसेच मोजणीविषयक प्रकरणांमध्ये आणि निकालांच्या अंमलबजावणीबाबत दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलादपूर तालुक्यासाठी कायमस्वरूपी तालुका भूमिअभिलेख उपअधिक्षकांची नियुक्ती होण्याची आवश्यकता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0