उरण । उरणमधील सुप्रसिद्ध चित्रकार टाकसाळ म्हणून प्रसिद्ध असलेले वसंत लडग्या गावंड यांचे सोमवारी, 2 डिसेंबर रोजी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गावंड यांनी आपल्या देशातील चलनामध्ये असलेल्या अनेक नोटा व नाण्यांना डिझाईन केले होते. उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपूत्र वसंत लडग्या गावंड यांची जगातील सर्वो त्तम आठ आर्टिस्टमध्ये गणना होत होती. हिंदुस्थानच्या विविध चलनी नाण्यांवर जी सुंदर व आकर्षक चित्रे त्याची डिझाईन स्टील व मास्टर पंचेस बनविण्याच्या कलेमध्ये ते हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ आर्टिस्ट होते.
अंत्यत हलाखीच्या परिस्थितीत आवरे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी एन आय हायस्कूल उरणचेमाजी मुख्याध्यापक कै. यशवंत किनरे सर यांनी त्यांना एन आय हायस्कूल मध्ये दाखल केले. त्यांची कलेची आवड लक्षात घेऊन किनरे सरांनी त्यांना जे जे स्कुल ऑफ आर्ट्स येथे इन्ग्रेव्हर आर्टिस्ट साठी प्रवेश घेण्यास भाग पाडले.
केंद्र सरकार एखाद्या महापुरुषाच्या किंवा ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ नाणी काढत असतात, त्यावेळी प्रथम त्या चित्राचे डिझाईन देशातील सर्वटांकसाळीतील कलाकारांकडून तयार करून घेतली जातात. त्यातून एका उत्कृष्ट नाण्याच्या डिझाईनची निवड केली जाते.वसंत गावंड यांनी आजपर्यंत त्यांच्या सेवाकाळात छत्रपती शिवाजी महाराज, पंडित नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, राजीव गांधी, इत्यादी महापुरुषांची आणि नववे एशियन गेम्स, स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव, कॉमन वेल्थ गेम्स, आदी महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित नाणी तयार केलेली आहे.
या डिझाईनची निवड करून भारत सरकारने त्यांची नाणी प्रसिध्द केली आहेत. एखाद्या कलाकाराकडून एक दोन जरी नाण्याची निर्मिती झाली तरी तो कलाकार कृतार्थ होतो. मात्र वसंत गावंड सरांच्या हातून प्रमुख राष्ट्रपुरुषांची अनेक नाणी तयार झालीत यावरून ते किती महान कलाकार होते यांचा अंदाज येतो. वसंत गावंड हे 2002 साली मुंबई येथील टाकसाळीतुन आर्टिस्ट इनग्रेव्हर या क्लास वन पदावरुन निवृत्त झाले. त्यांना लहानपणापासून संगीत कलेची आवड होती.
सुट्टी किंवा सणाच्या वेळी ते गावात येत, तेव्हा नेहमी बुलबुला (बेंजो) वाजवत. तोही मोठा भोंगा लावून. त्याचप्रमाणे ते हार्मोनियमदेखील सुंदर वाजवत असत. एप्रिल 2020 मध्ये त्यांनी तयार केलेल्या सर्व कलेचे जे जे स्कुल ऑफ आर्टस्? येथे भव्य असे प्रदर्शन होणार होते. पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. त्यांनी तयार केलेल्या कलाकृतीचे एखादे स्मारक त्यांच्या जन्म गावी तयार व्हावे ही इच्छा अनेक कलाप्रेमी करत आहेत. खरंच वसंत गावंड यांच्या या कलेला मनापासून सलाम. वसंत गावंड यांच्या अचानक जाण्याने उरणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.