कर्जत | माथेरान या पर्यटनस्थळी वर्षभर पर्यटक येत असतात. माथेरानमध्ये रस्ते हे लाल मातीचे तर काही रतसे हे मातीपासून बनवलेल्या ले पेव्हर ब्लॉक यांच्यापासून बनविलेले आहेत. त्यात मातीचे रस्ते ज्या भागात आहेत, त्या भागातून प्रवास करणारे विद्यार्थी, वयोवृद्धांना धुळीचा मोठा त्रास होत आहे. दरम्यान, रस्त्यावर उडणारी धूळ ही आजुबाजूंच्या झाडांवर जाऊन बसली असून झाडांच्या पानांचे रंगदेखील बदलले आहेत.
त्यामुळे माथेरान नगरपरिषद ते रस्ते धूळमुक्त कधी करणार? असा प्रश्न नागरिक विचारात आहेत. माथेरान हे शहर लाल मातीच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातील प्रमुख रस्ते सर्वोच्य न्यायालयाच्या परवानगीने मातीपासून बनवलेल्या ले पेव्हरपासून बनवले गेले आहेत. शहरातील दस्तुरी ते नगरपरिषद वाचनालय तसेच हॉटेल लाईनकडील आणि काही प्रेक्षणीय स्थळांचे रस्ते वगळता माथेरानमधील ८० टक्के रस्ते आजही लाल मातीचे आहेत.
त्यातील १३ रस्त्यांवर ले पेव्हर ब्लॉक लावण्याची कामे करण्यासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे. मात्र माथेरान पालिका प्रशासन उदासीन असल्याने त्यातील अनेक रस्ते लाल मातीचेच राहिले आहेत. २०२२ मध्ये आठ आठवड्यांसाठी शहरातील ११ रस्त्यांची कामे सर्वोच्च न्यायालयाने थांबविली होती.
मात्र त्यानंतर अडीच वर्षाचा कालावधी लोटला तरी माथेरान नगरपरिषद त्या रस्त्यांची गरज आणि उपयुक्तता याबाबत सर्वोच्य न्यायालयात आपले म्हणणे मांडू शकली नाही. त्याचा परिणाम शहरातील जे काही प्रमुख रस्ते ले पेव्हर लावण्यापासून वंचित आहेत. माथेरान नगरपरिषद वाचनालय ते छत्रपती शिवाजी महाराज रोड तसेच ऑलंपिया रेसकोर्सकडे जाणारा रस्त्यावर प्रचंड प्रमाणात माती असून ती माती माणसाच्या चालण्यानेदेखील उडत असते.
याच भागात माथेरान शहरातील दोन मोठ्या शाळा असून त्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास रस्त्यावरील धुळीचा होत आहे. धूळ उडून तोंडावाटे पोटात जात असून त्याचा परिणाम दररोज या रस्त्याने शाळेत जाणारे विद्यार्थी यांना ेशसनाचे आजार झाले आहेत.त्या सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावरील धुळीचा होणार त्रास कमी करण्यासाठी पालिकेने त्या रस्त्यावर ले पेव्हर ब्लॉक लावण्याची गरज पटवून देण्याची गरज आहे.
अग्निशमन यंत्रणा रस्त्यावर पाणी मारायला!
माथेरान शहरात आग लागली तर तातडीने अत्यावश्यक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी अग्निशमन वाहन देण्यात आले आहे. मात्र त्या वाहनांतून पाणी भरून माथेरान पालिका रस्त्यावर पाणी मारण्याचे काम करीत आहे. माथेरान पालिकेचा हा प्रकार कोणत्या अत्यावश्यक सेवेत बसतो असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी असलेले अग्निशमन यंत्रणा त्याच बाबीसाठी आरक्षित असली पाहिजे. मात्र माथेरान पालिका त्या वाहनाचा अन्य कारणासाठी वापर करीत असल्याने त्याबद्दल देखील पर्यटक नाराजी व्यक्त करतात.शहरातील सर्व रस्ते धूळ विरहित झाले तर मग विद्यार्थी पर्यटक यांच्या अंगावर धूळ उडणार नाही आणि त्यामुळे शहरातील रस्ते धूळ विरहित कधी होणार ? असा प्रश्न कायम आहे.