पोलादपूर कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू

कोकणवासीयांसाठी खुशखबर ; 40 मिनिटांचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार होणार

By Raigad Times    26-Feb-2024
Total Views |
 poladpur
 
पोलादपुर । मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय ठरणार्‍या बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिमग्यासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास अगदी जलद आणि सुलभ होणार आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, आता प्रवाशांची वाहतूक कोडींतून सुटका होणार आहे.
 
40 मिनिटांचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार पडणार आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी बाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होते.
 
आता पुन्हा एकदा कोकणातील शिगमोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे.
40 किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा
बोगदा प्रवाशांसाठी सुरु करण्याआधी दोन दिवसांपासून चाचणी घेण्यात येत बोती.अखेर शनिवारपासून मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक ही कशेडी बोगद्यातून वळवण्यात आली आहे. कशेडी बोगदा हा 2 किलोमीटर लांबीचा आहे. येथे प्रवास करताना 40 किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक असल्याचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.
लहान वाहनांना परवानगी
कोकणातील शिमगोत्सव हा कोकणवासियांच्या आस्थेचा विषय आहे. लाखो नागरीक शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल होतात. शिमगा सणापूर्वी सरकारने कशेडी बोगदा किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सिंगल लेन सुरू झालाय. पोलादपूर येथील भोगाव पासून सुरु होणारा कशेडी बोगदा खेड मधील कशेडी इथं बाहेर पडणार आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे.
नऊ किलोमीटरच्या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचणार आहे. सिंगल लेन सुरू झाल्यामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यना दिलासा मिळालाय.बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे.