रायगड पोलिस दलाच्या ताफ्यात १५ नवीन वाहने दाखल

14 Mar 2024 18:38:45
 alibag
 
अलिबाग | रायगड पोलीसांच्या ताफ्यात १५ नवीन वाहने दाखल झाली आहेत.रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी वाहनांचे वितरण पोलिसांना करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला तब्बल १ कोटी ९१ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.
 
रायगड पोलीस प्रशासन गतिमान करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटी २३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातुन रस्ते अपघातासंदर्भातील किट व साधन सामुग्री खरेदीकरिता २ कोटी रुपये, बॉम्बशोधक व नाशक पथक साहित्य खरेदीसाठी १० लाख रुपये आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी २३ लाख असा निधी दिला आहे.
 
alibag
 
पोलीसांना तीन स्कॉर्पिओ, दोन एमयूव्ही, ८ बोलेरो, दोन फोर्स तुफान अशी १५ वाहने उपलब्ध झाली आहेत. तसेच दुसर्‍या टप्प्यात आणखी १५ वाहने देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे रायगड पोलीस दलाचा कारभार गतिमान होण्यास मदत होणार आहे.
 
माणगाव, महाड आणि पेण येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सहा कोटी ४० लाख देण्यात येत आहेत, असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे आदी उपस्थित होते.
प्रांत आणि तहसिलदारांसाठी २२ वाहने येणार
जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडेदेखील वाहने नाहीत. त्यामुळे त्यांना भाड्याने किंवा खाजगी वाहनाने शासकीय प्रवास करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून, त्यांना नवीन २२ वाहने देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. सर्व अधिकार्‍यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Powered By Sangraha 9.0