.

महाड | रायगड लोकसभा मतदारसंघातून वंचित आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांच्या पत्नी कुमुदिनी चव्हाण मराठा समाजाच्या आहेत.त्यांच्याच नावाची चर्चा सुरु झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपले लोकसभेचे ९ उमेदवार जाहीर केले. यानंतर चव्हाण पत्रकारांकडे बोलत होते. रायगड रत्नागिरीतील जनता गेली आठ टर्म रायगड रत्नागिरी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार्या लोकप्रतिनिधींना कंटाळले असून वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने मतदारांना चांगला पर्याय देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रायगड लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व ६ वेळा अनंत गीते यांच्या रुपाने कुणबी समाज व २ वेळा सुनिल तटकरेंच्या रुपाने गवळी समाजाला मिळाले आहे. या मतदार संघात मोठ्या संख्येने असणारा मराठा समाज हा उमेदवारी पासून गेली ४० वर्ष वंचित आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून मराठा समाजाचा उमेदवार दिला जाणार असे चव्हाण यांनी सांगितले.रविंद्र चव्हाण हे जरी बेलदार समाजाचे असले तरी त्यांच्या पत्नी कुमुदिनी चव्हाण या मराठा समाजाच्या असून मराठा महासंघाच्या अध्यक्षा आहेत. त्या उच्च शिक्षित असून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक सामाजिक व शैक्षणिक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांना वंचितकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.