वावे गावातील ५३ घरांना फटका , सुधागड तालुयात वादळी पावसाचा धुडगूस

15 May 2024 16:04:31
 pali
 
पाली/बेणसे | सुधागड तालुयात सोमवारी (१३ मे) सायंकाळी मुसळधार वादळी पावसाने मोठी हानी झाली. येथील वावे गावात सर्वाधिक ५३ घरांचे नुकसान झाले आहे व एक वृद्ध महिला जखमी झाली.तसेच मजरे जांभूळपाडा येथील ३ घरांचे नुकसान झाले आहे.
 
याबरोबरच मुळशी ठाकूरवाडी, दहिगाव, वावे तर्फे आसरे, माणगाव बुद्रुक, करचुंडे येथे देखील घरांचे कौल आणि पत्रे फुटल्याची माहिती समोर आली आहे. काही गावांतील बत्ती देखील गुल झाली होती. सोसाट्याचा वारा व पावसामुळे घरांवरील सिमेंटचे पत्रे, कौल, पाईप उडाले.ते एका घरावरुन दुसर्‍या घरावर उडून पडले.
 
pali
 
तर घरांच्या भिंती कोसळल्या. जोरदार पाऊस पडत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले.अन्यथा खूप मोठी जीवितहानी झाली असती. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.महसूल प्रशासनाने या नुकसानाने जलद पंचनामे करुन शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
 
नायब तहसीलदार भारत फुलपगारे यांनी चिवे गावात घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन ग्रामस्थांची विचारपूस केली व पंचनाम्याच्या कामाचा आढावा घेतला.

pali
 
वादळी पावसामुळे गावातील घरांचे मोठे नुकसान झाले. घोंगवता जोरदार वारा गावात शिरला आणि त्याने होत्याचे नव्हते केले. सुदैवाने जीवितहानी टळली. महसूल प्रशासनाने लागलीच पंचनामे पूर्ण केले. मात्र आता लवकर नुकसान भरपाई मिळावी.
- केतन म्हसके, ग्रामस्थ, वावे गाव
वादळी वार्‍यासह पावसाने झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासन स्तरावर लागलीच सुरु करण्यात आले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना जिल्हा स्तरावरून लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करू. - भारत फुलपगारे,नायब तहसीलदार,पाली-सुधागड
Powered By Sangraha 9.0