रिव्हर्स घेताना एसटीच्या धडकेने भिंत कोसळली ! पाच मच्छी विक्रेत्या महिला जखमी,तळा एसटी स्थानकात दुर्घटना

25 May 2024 13:36:11
 tala
 
तळा । तळा एसटी स्थानकात रिव्हर्स घेताना एसटीची भिंतीला धडक बसली. या धडकेत भिंत कोसळून, ती मच्छी विक्रेत्या महिलांच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत 5 जहिला जखमी झाल्या. या घटनेनंतर स्थानकात नागरिकांनी गर्दी केली होती. जखमींना ताबडतोब तेथून बाहेर काढत उपचारासाठी तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
 
जखमी झालेल्या पाचही महिलांची प्रकृती स्थिर असून, त्यांना अधिक तपासणीसाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. तळा एसटी स्थानकातील संरक्षक भिंतीच्या डाव्या बाजूला भव्य मच्छी मार्केट आहे; परंतु मच्छी विक्रेते तिथे न बसता, एसटी स्थानक संरक्षक भिंतीला लागूनच दररोज मच्छी विक्रीसाठी बसलेले असतात.
 
एसटी स्थानकात नेहमीप्रमाणे एसटी आली आणि रिव्हर्स घेताना एसटीची भिंतीला धडक बसली. या धडकेत भिंत कोसळली आणि मच्छी विकणार्‍या लखमू माया सुतार, अनुसया लक्ष्मण सुतार, यमुना भामजी देवे, हिरा रामचंद्र फकीरे, लीला विजय खुटिकर यांच्या अंगावर मोठमोठाले दगड कोसळले.
 
यात त्या जखमी झाल्या.या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी या घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही अशीच घटना घडली होती. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून पुढील त्यांनी कार्यवाही करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. या घटनेमुळे दयनीय अवस्थेत असलेले तळा एसटी स्थानक पुन्हा चर्चेत आले आहे.
Powered By Sangraha 9.0