मुरुडमध्ये पावसाची दमदार सलामी,रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; विजेचा खेळखंडोबा,गारव्याने मुरुडकर सुखावले

10 Jun 2024 16:31:07
 Murud
 
मुरुड | मुरुड शहरासह तालुयात रविवारी (९ जून) पहाटे पावसाने थैमान घालत दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गेले कित्येक दिवस उकाड्याने त्रस्त झालेल्या मुरुडकरांना सुखद गारवा मिळाला आहे. पाऊस सुरू होण्याआधीच महावितरण वीज बंद करून खेळखंडोबा करीत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.
 
गेले कित्येक दिवस मुरुडकरांना हुलकावणी देत असलेल्या पावसाने अखेर आज पहाटे दमदार हजेरी लावली. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र हजेरी लावणार्‍या पावसाने मुरुडमध्ये तोंडच दाखवले नव्हते. त्यामुळे मुरुडचा पारा ४५ अंशावर गेला होता. गेल्या कित्येक दिवस पावसाचे ढग भरून येत होते, परंतु मुरुडकरांना हुलकावणी देत जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली होती.
 
पाऊस येण्याआधीच रात्रीची मुरुडकरांची बत्ती गुल करण्याचे काम महावितरण चोख बजावत होते. मुरुडचा पारा ४५ अंशावर गेल्यामुळे मुरुडकर बेहाल झाले होते. त्यात दिवस व रात्र दोन्ही वेळेला महावितरण विज बंद करत असल्याने वीजग्राहक हैराण झाले होते.
 
Murud
 
महावितरणने मार्च महिन्यापासून दुरुस्ती व झाडे तोडण्यासाठी लोडशेडींगचं आयोजन केले होते. तीन महिने झाले तरीही यांची अवेळी वीज घालविण्याचे काम सुरूच आहे. मग हे महावितरणचे कर्मचारी तीन महिने काय करीत होते? असा संवाल वीज ग्राहकांनी उपस्थित केला आहे.
 
रविवारी पहाटे दीडच्या सुमारास महादवितरणने वीज बंद करून वीज ग्राहकांच्या झोपेचे अक्षरशा खोबरे केले. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास पावसाने सुरुवात केली त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुरुडकरांना तुर्तास तरी दिलासा मिळाला मुरुडचा पारा २५ अंशापर्यंत घसरला आहे.
Powered By Sangraha 9.0