पनवेल | पनवेल शहरातील एका सेवानिवृत्त ६४ वर्षीय महिलेची ऑनलाईन पद्धतीने अपसंपदेचा धाक दाखवून फोनवरुन
तब्बल साडेपाच कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. मागील महिन्यात ही घटना घडली असून दोन दिवसांत या महिलेला
पोलिसांची कारवाई होईल, अशी भीती फोनवरुन दाखवून या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.संबंधित महिला ही खासगी कंपनीत मानव संसाधन विभागात महिला काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी दिली. या महिलेने सेवानिवृत्त झाल्यावर आयुष्यभर जमविलेल्या बँकेतील रकमेवर भामट्यांनी ऑनलाईन पद्धतीने डल्ला मारला.
८ मे रोजी पळस्पे फाटा येथील साईवर्ल्डसीटी या संकुलामध्ये राहणार्या ६४ वर्षीय महिलेला फोनवरुन सकाळी साडेनऊ वाजता संपर्क साधून फोनवरील व्यक्तीने त्याची ओळख सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच दुसर्या व्यक्तीने तो मुंबई येथील टेलीकॉम रेग्युलेटरी प्राधिकरणाचा नोटरी अधिकारी असल्याची ओळख सांगितली.
या दोनही भामट्यांनी ६४ वर्षीय महिलेला ‘तुमच्या मोबाईलवरुन इतरांना फोन करुन मानसिक त्रास दिला जात असून त्याच्या तक्रारी सीबीआयकडे नोंदविल्याचे’ सांगण्यात आले. त्यामुळे या महिलेच्या अपसंपदेची तक्रार सीबीआयकडे केल्याने १० वर्षाचा तुरुंगवास भोगण्याची भीती दाखविण्यात आली.