पोलीस भरतीवर पावसाचे ढग!४२२ जागांसाठी ३१ हजार अर्ज,रायगड पोलिसांची लागणार कसोटी

२१ जूनपासून रायगडात पोलीस भरती

By Raigad Times    18-Jun-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हा पोलीस दलात २१ जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या भरतीवर पावसाचे ढग कायम राहण्याची शक्यता दिसत आहे. जिल्ह्यात ४२२ पदांसाठी तब्बल ३१ हजार ६३ अर्ज दाखल झाले आहेत. ३० दिवस ही भरती प्रक्रिया सुरु राहणार असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस शिपाई पदासाठी (बॅन्ड्समन समाविष्ठ ९ पद) ३९१ व चालक पोलीस शिपाई ३१ पदांसाठी ही भरती होणार आहे.
 
पोलीस शिपाई पदाकरिता २३ हजार ७९३ पुरुष, तर ४ हजार ८६० महिला असे एकूण २८ हजार ८३३ अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर चालक शिपाई पदाच्या ३१ रिक्त जागांसाठी २ हजार २३० अर्ज प्राप्त झाले असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
 
या पोलीस भरतीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून ओळखीचे, आमिष दाखवून, पैशांची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तात्काळ पोलीस अधिक्षक कार्यालय, दुरध्वनी क्रमांक या ०२१४१-२२८४७३, ८६०५४९४७७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
 
अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती होणार असून कुठल्याही प्रकारे गैरव्यवहार होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, जूनचा उतरार्ध म्हणजे मुसळधार पावसाचा काळ समजला जातो. या पावासात पोलीस भरती करुन घेणे रायगड पोलिसांसमोर एक आवाहनच आहे.
भरतीचे ठिकाण
जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप, १०० मीटर धावणे व गोळा फेक चाचणी.आर.सी.एफ कॉलनी कुरुळ येथे १६०० व ८०० मीटर धावणे चाचणी.
पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या सुविधा
* पोलीस भरतीकरीता येणार्‍या उमेदवारांना जिल्हा क्रिडा संकुल नेहुली येथे बॅडमिंटन हॉलमध्ये एकावेळी सर्व उमेदवार बसतील अशी व्यवस्था केलेली आहे.
* पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांना पुढील सुयोग्य तारीख दिली जाणार आहे.
* काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमदेवारांना दुसरी तारीख दिली जाईल.
* काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल.