थोडक्यात टंचाई! उरणच्या पुनाडे धरणात ठणठणाट , २५ हजार नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

By Raigad Times    27-Jun-2024
Total Views |
uran
 
उरण | उरण तालुक्यातील पुनाडे धरणात ठणठणाट झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीपातळी कमालीची खालावत चालल्याने, धरण कोरडे पडत असल्याचे भयानक चित्र समोर येत आहे. त्यामुळे तालुयातील २५ हजार रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
 
त्यामुळे रहिवाशांना टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी पुनाडे आठ गाव ग्राम नळ पाणीपुरवठा कमिटीच्यावतीने तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतीच्या सिंचनासाठी लघु पाटबंधारे विभागाने उरण तालुयातील पुनाडे ग्रामपंचायत हद्दीत १९९१ साली हे धरण (बंधारा) बांधले; मात्र या धरणाचे पाणी सिंचनासाठी उपयोगात येत नसल्यामुळे उरण पूर्व भागातील टंचाईग्रस्त आठ गावांना या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरण्याची योजना राबविण्याचा निर्णय रायगड जिल्हा परिषदेने घेतला.
 
तेव्हापासून १.७५ एमसीएम एवढी पाण्याची क्षमता असलेले पुनाडे धरण उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोण, पाले, आवरे, गोवठणे, कडापे, पाणदिवेया गावांतील रहिवाशांची तहान पुनाडे नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून भागवत आहे.
 गतवर्षी उरण तालुयात पाऊस कमी झाल्याने धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला. धरणातून होणारी पाण्याची गळती, वाढती उष्णता यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने खाली गेली होती.
 
त्यातच जून महिना संपत आली तरी, पावसाने पाठ फिरविल्याने धरणातील उरलासुरला पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. त्यामुळे २५ हजार नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे. सद्यस्थितीत रहिवाशांना दुषित पाणीपुरवठा होत आहे.
 
मातीमिश्रित पाण्यामुळे पंप बंद पडून पाणी पुरवठा बंद होत असल्याने भर पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच सदर रहिवाशांना टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पुनाडे आठ गाव नळपाणीपुरवठा कमिटीच्या अध्यक्षा तथा वशेणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनामिका म्हात्रे यांनी उरणचे तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सारडे गावचे सरपंच, आवरे गावच्या सरपंच तसेच कमिटी सदस्य प्रशांत म्हात्रे, पाले अमित म्हात्रे व आवरे संतोष पाटील उपस्थित होते.
हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करावा

uran  
 
उरण पूर्व विभागातील रहिवाशांना पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु जून महिना संपत आला तरी पाऊस पडला नाही. त्यामुळे उरलासुरला धरणातील जलसाठा संपुष्टात येत आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तरी शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून रहिवाशांना तात्काळ टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा - अनामिका हितेंद्र म्हात्रे, सरपंच, वशेणी ग्रामपंचायत