पर्जन्यमान अचूक मापनासाठी ‘रेनगेज’ वाढविण्याची गरज

01 Jul 2024 13:06:55
 poladpur
 
पोलादपूर । दक्षिण रायगड, त्यातल्या तर महाड, पोलादपूर तालुक्यात कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाच्या दैनंदिन मोजणीसाठी ‘रेनगेज’ची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या मागील तालुका भूमीअभिलेख उपअधिक्षक कार्यालयाच्या प्रांगणामध्ये शहरातील पर्जन्यमान मोजण्यासाठी ’रेनगेज’ कार्यरत आहे. याखेरिज, कोंढवी, कुडपण, कोतवाल, देवळे, पळचिल, कापडे खुर्द आणि धारवली भागातही दररोजच्या पर्जन्यमापनासाठी ’रेनगेज’ची आवश्यकता असून या ’रेनगेज’द्वारे तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान मोजणे शक्य होणार आहे.
 
गेल्या 10 वर्षांतील पावसाचे प्रमाण पाहता, पोलादपूर तालुक्याच्या गावात पूरस्थिती उद्भवण्यापूर्वी कोतवाल, ओंबळी या कुडपणलगतच्या गावात तसेच सवादनजिकच्या माटवण, कालवली या भागात आणि उमरठनजिकच्या पितळवाडी, देवळे भागात पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
 
तालुक्यातील सरासरी पावसाची नोंद केवळ पोलादपूर येथून काढता येणार नसून ढवळी, कामथी आणि घोडवनी नद्यांसह सावित्री नदीच्या खोर्‍यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास त्या परिसरात अधिक पर्जन्यवृष्टी झाल्याचे आकडेवारीसह सप्रमाण सांगता येत नाही.तसेच चोळई नदीसह कोंढवी, तामसडे, धामणदिवी भागातील उपनद्यांची पात्र भरून सावित्रीला मिळाली तरीही पूरस्थिती निर्माण होत असून यावेळी या भागातही पर्जन्यमापनाची सुविधा असणे आवश्यक आहे.
 
आपत्ती निवारण कार्यावेळी ज्याप्रमाणे काही गावांमध्ये बिनतारी संदेशवहन यंत्रणा देण्यात आल्या आहेत. त्याचधर्तीवर, पोलादपूर तालुक्यातील विविध ग्रामीण भागामध्ये दररोज होणार्‍या पावसाची मोजदाद करून सदरची नोंद तहसिल कार्यालयातील आपत्तीनिवारण कक्षाला कळवून अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज काढणे शक्य होणार आहे.
 
काही वर्षे आधी काही गावांमध्ये बसविण्यात आलेल्या ‘रेनगेज’च्या नादुरूस्तीमुळे विविध भागातील पर्जन्यमान मोजण्याचे सातत्य राहिले नसल्याने 2021 मध्ये अतिवृष्टी काळात कोठे किती पाऊस होत आहे, याबाबत प्रशासनाला अंदाज आला नव्हता. त्यावेळी तहसिलदार रजेवर गेल्याने निवासी तहसिलदारांवर आपत्ती निवारणाची जबाबदारी आल्याने मदतीकामी पेणचे प्रांताधिकारी इनामदार यांना पाचारण करण्यात आले.
 
आता सद्यस्थितीत पोलादपूर पुन्हा अतिवृष्टी, भूस्खलन आणि महापूराच्या उंबरठ्यावर असताना स्थानिक पोलीस पाटील व कोतवाल हे गांव कामगार आणि प्रशासनाचा संपर्क राहण्यासाठी वायरलेस यंत्रणेप्रमाणेच ‘रेनगेज’ची आवश्यकता दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0