मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरची स्कुटीला धडक, तरुणाचा मृत्यू

By Raigad Times    11-Jul-2024
Total Views |
khopoli
 
मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहे. आज (11 जुलै) सकाळी कंटेनरने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटीचालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खालापूर तालुक्यातील हाळ फाटा येथे घडली.
ओमकार सुभाष अडकर (वय 25, रा.खोपोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. ओमकार आज सकाळी कामावर जाण्यासाठी स्कुटीवरुन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन कर्जतच्या दिशेने निघाला होता. नऊ वाजण्याच्या सुमारास हाळ फाटा येथे भरधाव कंटेनरने ओमकारच्या स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने ओमकारचा जागीच मृत्यू झाला.
 
अपघातानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंटेनरचालकाचा शोध सुरु आहे. दरम्यान, कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या 25 वर्षीय ओमकारच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, खालापूरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.