कशेडी घाटात दुर्घटना! भरधाव टँकर घुसला ढाब्यात; चालकाचा मृत्यू

By Raigad Times    18-Jul-2024
Total Views |
 poladpur news
 
पोलादपूर । मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात अपघाताचे सत्र सुरुच आहे. आज (18 जुलै) दुपारी एक भरधाव टँकर उतारावरुन थेट धाब्यामध्ये घुसला. या अपघातात ढाब्याच्या छप्पराचा लोखंडी पाईप केबिनची काच फोडून चालकाच्या छातीत घुसल्याने, चालकाचा मृत्यू झाला.
 
पोलादपूर तालुक्यातील चोळई गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. चोळई गावठाण बाजूच्या सोना ढाबा हॉटेलसमोर महामार्गाची अचानक लेन बदलण्याच्या परिस्थितीमुळे अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. कशेडी घाटातील रस्त्याचा तीव्र उतार असल्याने या ठिकाणी वेगावर नियंत्रण ठेवताना वाहनावरदेखील नियंत्रण ठेवणे वाहनचालकांना कठीण होत असल्याने अपघाताचे सातत्य निर्माण झाले आहे.
 
आज दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटातून लक्ष्मीलाल भुरालाल मिनारीया (वय 54, रा. रूनदेड, उदयपूर, राजस्थान) हा टँकर घेऊन भरधाव वेगाने कशेडी घाटरस्ता उतरून पोलादपूरच्या दिशेला जात होता. डावीकडील लेनवर जाण्यासाठी स्टेअरिंग वळविल्यानंतर चालकाला ते पुन्हा सरळ करता आले नाही. परिणामी, टँकर भरधाव वेगाने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या हॉटेल सोना ढाबाच्या इमारतीमध्ये घुसला. यावेळी ढाब्याच्या छप्पराचा लोखंडी पाईप ड्रायव्हर केबिनची काच फोडून आत आला आणि चालक लक्ष्मीलाल मिनारिया याच्या छातीमध्ये डाव्या बाजूला घुसला.
अशा गंभीर जखमी अवस्थेत चालकाने टँकरचे ब्रेक दाबून थांबविण्यात यश मिळविले. यावेळी पोलादपूर पोलिसांनी चालकाला छातीत घुसलेला पाईप काढून रुग्णवाहिकेतून ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.