रेवस जेट्टीवर समुद्रमार्गे डिझेलची अवैध तस्करी; 36 लाखाचा मुद्देमाल जप्त

By Raigad Times    19-Jul-2024
Total Views |
boat 
अलिबाग । रेवस जेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटींवर कारवाई केली आहे. या कारवाईत चारजणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३६ लाख ४० हजार रुपये किमतीचा ३३ हजार लिटर डिझेल व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. समुद्र मार्गे डिझेलची तस्करी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्या होत्या, त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना निर्देश दिले होते. त्यांनी सात जणांचे एक पथक तयार केले. या पथकाचे रेवस जेट्टीवर लक्ष होते.
बुधवारी, १७ जुलै रोजी या पथकाला रेवस जेट्टी येथील समुद्रकिनारी एक बोट समुद्रमार्गे डिझेल घेऊन येणार असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली होती. संशयीत बोट किनाऱ्यालगत येऊन थांबताच या पथकाने बोटीजवळ जावून पाहणी केली.
रायगड पोलिसांची कारवाई; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पंचाच्या समक्ष बोट व बोटीमधील ३३ हजार लिटर डिझेल असा एकूण ३६ लाख ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गणेश काशिनाथ कोळी (वय ४० वर्षे, रा. बोडणी), विनायक नारायण कोळी (वय ४५ वर्षे रा. बोडणी) गजानन आत्माराम कोळी (वय-४५ रा. बोडणी) मुकेश खबरदात निषाद (उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. केलेल्या पाहणीत बोटीमध्ये चौघेजण मिळून आले. बोटीमध्ये असलेल्या मालाबाबत चौकशी केली असता डिझेल असल्याचे सांगितले.