युद्धनौका ब्रह्मपुत्रा मुंबईजवळ कलंडली ! आधी आग, नंतर समुद्रात झुकली; 1 अधिकारी बेपत्ता

By Raigad Times    23-Jul-2024
Total Views |
MUMBAI
 
मुंबई । समुद्री सुरक्षेसाठी तैनात असलेली ‘आयएनएस ब्रह्मपुत्रा’ या युद्धनौकेला आग लागल्याची घटना घडली. यानंतर ही नौका समुद्रात कलंडायला लागली असून तिला पूर्ववत करण्यासाठी बचाव पथक व संबंधित यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर या युद्धनौकेवरील एक अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
 
मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आणि महत्त्वाचं शहर आहे. मुंबईतील अरबी समुद्रातील विविध बंदरावरुन जहाजांची येजा सुरू असते. येथील काही महत्त्वाच्या बंदरावर युद्धनौकाही तैनात असतात. यापैकी ‘आयएनएस ब्रह्मपुत्रा’ या युध्दनौकेला समुद्रात अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.
 
युद्धनौका समुद्र मार्गावर असताना रविवारी या युद्धनौकेवर आग लागली होती, आज पहाटे ही आग आटोक्यात आणण्यात यंत्रणांना यश आले. नौसेना डॉकयॉर्ड, मुंबई (एनडी एमबीआय) येथील बंदरावर असलेल्या इतर जहाँजांच्या अग्निशमन दलाने ब्रह्मपुत्रावरील आग आटोकण्यात आणण्यात मोलाची भूमिका निभावली. मात्र, दुपारनंतर ही युद्धनौका एका बाजूने कलंडायला सुरुवात झाली आहे. सोमवारी (22 जुलै) ही युद्ध नौका पूर्णपणे एका बाजूने कलंडलेल्या स्थितीत आहे.
 
तिला पूर्ववत स्थितीत आणण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले, मात्र अजूनही त्यात यश आलेलं नाही. या अपघातात एक जूनियर सेलर बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबई बंदरात नेवल डॉक्यार्डवर युद्धनौकेचे री फिटिंग सुरू होते. त्यादरम्यान आग लागली आणि आज ही युद्धनौका एका बाजूने कलंडलेली आहे.
 
आयएनएस ब्रह्मपुत्रावर लागलेल्या आगीच्या घटनेनंतर युद्धनौका एका बाजुला झुकली असून ती आणखी खोलात जात आहे. सातत्याने शर्थीचे प्रयत्न करुनही आपल्या बर्थसह ही युद्धनौका आणखी खोलात झुकत असून सध्या एका बाजुवर स्थीर आहे. या युद्धनौकेतील एक ज्युनियर नाविक बेपत्ता असून इतर सर्व अधिकारी व कर्मचारी सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय नौसेनेकडून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.