घरावर मातीचा ओसरा आल्याने ९ घरांना सतर्कतेचा इशारा

दासगांवकर पुन्हा भितीच्या छायेखाली

By Raigad Times    24-Jul-2024
Total Views |
 mhad
 
महाड | महाड तालुयात गेल्या तीन चार दिवस अतिवृष्टी होत असून मंगळवारी (२३ जुलै) सकाळी दरडग्रस्त दासगांव मोहोल्यातील फकीरवाडी या ठिकाणी एका घरावर भला मोठा दगड धडकल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. याघटनेनंतर परिसातील ९ घरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून महाड तालुयाला पावसाने झोडपून काढले आहे. संपूर्ण तालुयात दरडग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
 
प्रशासन होणार्‍या घटनेसाठी सज्ज असताना मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महाड तालुयातील दासगाव गावचे हद्दीत मोहल्ल्याला लागून असलेल्या फकीर वाडी या ठिकाणी इब्राहिम गुलाम हुसेन शेख यांच्या घराच्या मागच्या बाजूने डोंगर भागातून मातीचा ओसरा येऊन त्यातील एक भला मोठा दगड येऊन भिंतीवर आदळल्याने घरातील काही भिंतींना तडे गेले तर काही भिंतींचा भाग कोसळला. या घरामध्ये पाच लोकांचे कुटुंब राहते. घटना घडली त्यावेळी इब्राहिम आणि त्यांची सून हे दोघेच घरामध्ये होते. दगड आदळल्यानंतर मोठा आवाज झाला. या आवाजानंतर इब्राहिम यांनी आपल्या सुनेला घेऊन घरातून पळ काढला. घटनेनंतरत्या परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच दासगाव ग्रामस्थांची एकच गर्दी झाली. तलाठी यांनी घटनेच्या ठिकाणाचा पंचनामा केला असता घराचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे. सध्या या परिसरात ९ घरे आहेत त्यामध्ये लोकही राहत आहेत.
 
पुन्हा या ठिकाणी डोंगर भागातून कधीही दरड कोसळण्याची शयता असल्याने या सर्व लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती दासगाव तलाठी एम. डी. केसरकर यांनी दिली. दरम्यान, १९ वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टी मध्ये दासगांव, जुई, रोहन, कोंडिवते येथे दरड कोसळून दरडी खाली १०० हून अधिक लोक गाडली गेली होती. दासगावमध्ये ३७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.