1 लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला क्रांतिकारी अर्थसंकल्प- आ. प्रशांत ठाकूर

03 Jul 2024 18:41:08
 panvel 1
 
पनवेल । राज्याचा अर्थसंकल्प खर्‍या अर्थाने महिला, वारकरी, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. 1 लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करणारा असून महाराष्ट्राला नवी दिशा देणार्‍या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देत सरकारचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.
 
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहर अध्यक्षअनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी काम करत आहे.
 
राज्याचे वित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पातून महिला, ज्येष्ठ, युवा, शेतकरी, दुर्बल घटकांसाठी विविध योजना सादर करतानाच पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातील महत्वाच्या योजना मांडत राज्याच्या विकासावर भर दिला असून या महत्वपूर्ण अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले.
 
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले कि, महिलांसाठी विविध योजना आखत महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून होत आहे. अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकारच्या वतीने महिना 1 हजार 500 रुपये देण्यात येतील.
 
या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार असून योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, महिलांना या योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी येत्या रविवारपासून पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, कामोठे, खारघर येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे ुआमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0