उरणमधील सततच्या वाहतूक कोंडीविरोधात मनसेे आक्रमक , 11 व 12 जुलैला रास्ता रोकोचा इशारा

By Raigad Times    03-Jul-2024
Total Views |
 uran
 
उरण । उरण तालुक्यातील खोपटा कोप्रोली, गव्हाण फाटा, चिर्ले आणि दिघोडे या महत्त्वाच्या रस्त्यावर रात्री अपरात्री होणार्‍या वाहतूक कोंडीचा सामना हा नाहक सर्वसामान्य प्रवाशांना तसेच नवीमुंबई परिसरात जाणार्‍या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा वाहतूक कोंडी पासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरुवार 11 जुलै रोजी खोपटा कोप्रोली रस्त्यावर तर दिघोडे येथे 12 जुलै रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
याबाबत उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे तसेच नवीमुंबई पोलीस आयुक्त, कस्टम विभाग यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती मनसेचे उरण तालुका अध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी दिली आहे.उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत आहे.परंतु उरण पुर्व विभागातील रहिवाशांच्या रहदारीच्या खोपटा, कोप्रोली, गव्हाण फाटा, चिर्ले , वेेशी आणि दिघोडे रस्त्यावर रात्री अपरात्री बेधडकपणे अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते.
 
त्याचा त्रास हा सातत्याने सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करणार्‍या रुग्णांना विद्यार्थी प्रवाशांना ही सहन करावा लागत आहे. त्यात यार्ड गोदामात पार्किंगची व्यवस्था नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त कंटेनरची हाताळणी हे व्यावसायिक करत असल्याने सदर रस्त्यावर व गोदामात बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघात होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा मनसेच्या वतीने मनसेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी दिला आहे.