शिहू, बेणसे विभागातील जनता वीज समस्येने हैराण ...अन्यथा, वीज वीतरण अधिकार्‍यांना कोंडून ठेवणार!

महिला, तरुणांचा आक्रमक पवित्रा, दोन दिवसांचा अल्टीमेटम

By Raigad Times    03-Jul-2024
Total Views |
pali
 
पाली/बेणसे । शिहू बेणसे विभागात वर्षाचे बारा महिने...उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतूत असो विजेचा लपंडाव सुरु असतो. वर्षानुवर्षे वीज वितरण विभागाकडून जनतेला वेठीस धरले जातेय. मात्र आता संयमाचा बांध फुटत चालला असून, शिहू, बेणसे विभागातील जनता आक्रमक झाली आहे. वीज वितरणने दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर पेण वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्‍यांना कोंडून ठेवू, असा इशारा संतप्त महिला, तरुणांनी दिला आहे.
 
या विभागातील वीज समस्येसंदर्भात मंगळवारी (2 जुलै) बेणसे सिध्दार्थ नगर येथे बैठक पार पडली. यावेळी बबन अडसुळे, अ.का. म्हात्रे, विजय एटम, अनंत भुरे, अनिल शिंदे, उत्तम सावंत, योगेश अडसुळे, सुरेश भगत, सुनील पवार, प्रशांत गोरे, महेंद्र ठाकूर, हरेश पाटील, अनंत पाटील, नरहरी ठाकूर, प्रवीण म्हात्रे, कल्पना अडसुळे, सुमन अडसुळे, कविता अडसुळे, छायाबाई सावंत, पद्माआई अडसुळे, सुषमा अडसुळे आदिंसह ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
 
पावसाळा सुरू असून संपूर्ण पेण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात दिवसा व रात्री सातत्याने बत्ती गूल होते. अजून मुसळधार पाऊस, अतिवृष्टी सुरू झालेली नाही, तरी वीज वितरण विभागाचा गलथान कारभार दिसून येत आहे. विजेच्या समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले असल्याचे बबन अडसुळे म्हणाले. शिहू बेणसे परिसरासह अन्य भागात विजेचा लपंडाव काही केल्या थांबत नाहीये.
 
रात्री मच्छर रक्त पितात, दिवसा उष्म्याने अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेचा लपंडाव थांबवा, वीज पुरवठा सुरळीत करा, सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा संताप महिला वर्ग व तरुणाईतून व्यक्त होत आहे.
 
शिहू बेणसे विभागाला तालुका प्रशासनाकडून नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. या ठिकाणी एका वीज गायब झाली की, केव्हा पूर्ववत होईल याचा पत्ता नसतो. कर्मचारी वीज गेल्यानंतर नॉटरिचेबल होतात. शिहू बेणसे विभागातील जनतेला वर्षातील बाराही महिने वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर हा विजेचा लपंडाव थांबला नाही, तर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा म्हात्रे यांनी दिला.
बँकांचे व्यवहार होतात ठप्प
वीजपुरवठा खंडित होताच बँकांचे व्यवहार ठप्प होत आहेत. नेटवर्क सेवा बंद पडत आहे. इंटरनेट सुविधेशी संबंधित सर्व शासकीय निमशासकीय कामे बंद होत आहेत. याठिकाणी कधी सलग तीन-चार दिवस तसेच अनेकदा दहा दिवसही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय? असा संताप यावेळी अनंत भुरे यांनी व्यक्त केला आहे.
 
शिहू बेणसे विभागात आदिवासी वाड्यापाड्यांचा समावेष असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे. अशातच सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. अशातच असह्य उष्म्यापासून बचाव करण्यासाठी लोक घराबाहेर बसत आहेत. सर्प, विंचू व किटकांची भिती असल्याने अंधारात घराबाहेर बाहेर पडणे नागरिकांना धोक्याचे झाले आहे. असे विजय एटम म्हणाले.