महाडचे ग्रामीण रुग्णालय होणार उपजिल्हा रुग्णालय , 100 खाटांच्या हास्पीटल इमारतीसाठी 82 कोटींचा निधी मंजूर

05 Jul 2024 13:15:07
 mahad
 
महाड । महाड येथे असणारे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतरीत होणार असून या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी विशेष बाब म्हणून 82.11 कोटीच्या अंदाजपत्रक व आराखड्यास आज शासन मान्यता मंत्रीमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे. यासाठी आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.
 
मुंबई गोवा महामार्गावरील ऐतिहासिक शहर म्हणून महाडची ओळख आहे. या शहराजवळून जाणारा महामार्ग, त्यावर होणारे अपघात, महाडमध्ये असलेले चवदार तळे, जवळच असलेला किल्ले रायगड या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी येणारे पर्यटक विचारात घेता महाडमध्ये असलेल्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असणार्‍या सोयी सुविधा देण्यात होणार्‍या गैरसोयी विचारात घेऊन महाड मधील ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी आमदार गोगावले यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.
 
यातूनच 7 मार्च रोजी महाड येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आज झालेल्या कॅबीनेट बैठकीत महाड येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी 82.11 कोटीच्या अंदाजपत्रक आणि आराखड्यास प्रशासकिय मान्यता देण्यात आल्याची माहिती गोगावले यांनी दिली.
 
त्यामुळे महाड पोलादपूर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील जनतेची आरोग्यासाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे. या उप जिल्हा रुग्णालयाच्या इमारत निधीला प्रशासकिय मान्यता मिळाल्याने महाड मतदार संघातील जनतेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचेही आभार व्यक्त होत आहे
Powered By Sangraha 9.0