बोगस जामीनदाराचा शोध सुरु , बनावट कागदपत्रे देऊन पनवेल न्यायालयाची फसवणूक

05 Jul 2024 19:23:07
 panvel
 
पनवेल | अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात जामीन देण्यासाठी एकाने पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आनंद रमेश यादव (२७) असे या बोगस जामीनदाराचे नाव आहे. पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत, त्याचा शोध सुरु केला आहे.
 
पनवेल तालुका पोलीस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅटच्या गुन्ह्यात गौरव तिवारी याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याने जामीनदार म्हणून आनंद रमेश यादव या बोगस व्यक्तीला न्यायालयात उभे केले होते.
 
आनंद यादव याने कल्याण म्हारळगांव येथील गणेश नगरमधील पत्ता असलेल्या रेशनकार्डची छायांकीत प्रत आणि म्हारळगाव ग्रामपंचायतीकडील २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा असेसमेंट उतारा सादर केला होता.न्यायाधिशांना जामीनदार आनंद यादव याच्या कागदपत्रांबाबत संशय आल्याने त्यांनी सदर कागपत्रांची पडताळणी करुन त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
 
त्यानंतर आनंद यादव याने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी पडताळणी केली असता, रेशनकार्ड आणि म्हारळगावचा असेसमेंटचा उतारा बनावट असल्याचे आढळून आले.आनंद यादव याने न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करुन न्यायालयाची फसवणूक केल्याचे आढळून आले. त्यामुळे न्यायाधिशांनी बोगस जामीनदार आनंद यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आनंद यादवविरोधात फसवणुकीसह बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Powered By Sangraha 9.0