मुंबई । महाराष्ट्र विधानपरिषदे 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात कायम आहेत. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे यानिवडणूकीत कुठल्या तरी एका उमेदवाराची विकेट उडणार आहे.
शेकापनेते आ. जयंत पाटील यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर माघार घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वेळ संपूनही कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही.
त्यामुळे आता येत्या 12 तारखेला विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळेल. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधिमंडळात मतदान पार पडेल. हे मतदान गुप्त पद्धतीने होत असल्याने मोठ्याप्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. तसेच गुप्त पद्धतीमुळे मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाची मतं फुटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोघे मैदानात उतरले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पाठिंब्यावर शेकापचे आ. जयंत पाटील, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
वास्तावात मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध या निवडणुकीत कामाला येणार का, हे पाहावे लागेल. तसे झाल्यास मिलिंद नार्वेकर सत्ताधारी महायुतीमधील कोणत्या पक्षाची मते फोडणार हे पाहण्यासारखे आहे. दुसर्याबाजून शेकापनेते आ. जयंत पाटील हे महाआघाडीच्या भरवशावर निवडणूक लढवत आहेत. इतक्या वर्षांचे त्यांचे संबध यावेळी देखील त्यांना कामी येतील का? याची उत्सुक्ता रायगडकरांना आहे.
प्रथम पसंतीची 23 मतांची आवश्यकता
या निवडणूकीत उद्धव ठाकरेंनी मोठा डाव खेळला आहे. ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना 12वे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता बळावली आहे. नार्वेकर ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांमध्ये सर्वात शक्तिशाली आहेत. नार्वेकर यांना विजयासाठी विधानपरिषद निवडणुकीत प्रथम पसंतीची 23 मतांची आवश्यकता आहे.
मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेच्या फुटीनंतरचे असे नेते आहेत. ज्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही प्रत्यक्ष भेटले होते. नार्वेकर हे गेल्या दोन दशकांपासून उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून कार्यरत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे एकूण 15 मते आहेत. अशा स्थितीत मिलिंद नार्वेकर यांचा विजय निश्चित करण्यासाठी पक्षाला आणखी आठ मतांची गरज भासणार आहे.
कुणाकडे किती संख्याबळ
*भाजप महायुती । एकूण 201
*भाजप | 103,
*शिंदे सेना | 37,
*राष्ट्रवादी (अ.प) | 39,
*छोटे पक्ष | 9
*अपक्ष | 13
*काँग्रेस | 37
काँगे्रस मविआ । एकूण 67
*ठाकरे गट | 15
*राष्ट्रवादी (श.प) | 13
*शेकाप 1, अपक्ष 1
*एमआयएम 2, सपा 2, माकप 1 क्रां. शे. प. 1
हे 6 आमदार तटस्थ