स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविणार , महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

09 Jul 2024 13:21:16
 MUMBAI
 
मुंबई । शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत मागील तीन वर्षात 16,885 अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रुपांतर झाले असून याची गती वाढविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत सांगितले.
  
भाडेतत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली असून अधिकची वाढ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील अंगणवाड्यांबाबत सदस्य भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे, गोपीचंद पडळकर, जयंत पाटील, सुनील शिंदे आदींनी भाग घेतला.
 
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्यात 1 लाख 10 हजार 556 अंगणवाडी केंद्र आहेत. यापैकी 72,379 केंद्र स्वमालकीच्या जागेत आहेत. ज्या केंद्रांना स्वमालकीची जागा नाही तेथे जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी केली आहे. जेथे अंगणवाडी केंद्र नाहीत अशा 8084 नवीन अंगणवाडी केंद्रांचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत.
 
ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध होत नाही अथवा वीज खंडित होते त्याठिकाणी सोलरच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्राच्या जागेत स्वच्छता असावी, तसेच भाड्याच्या जागेसाठी रेडीरेकनर प्रमाणे भाडे द्यावे, अशी सूचना उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी यावेळी केली.
Powered By Sangraha 9.0