पाली | भाजपमध्ये नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांची खासदारकी अवघ्या १७ महिन्यांची आहे असे वक्तव्य शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. ते खालापूर येथे बोलत होते. सुधागड तालुक्यातील संत नाम देव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव या ठिकाणी स्वर्गीय नामदेव खैरे यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच सुशीला नामदेव खैरे रंगमंचाचे उद्घाटन रविवारी ते (२५ ऑगस्ट) त्यांच्या हस्ते करण्यात आले. धैर्यशील पाटील यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
लोकसभेची जागा त्यांना मिळणार अशी चर्चा होती. मात्र भाजपने त्यांना थेट राज्यसभेवर पाठवले आहे. यावर त्यांचे पुर्वाश्रमीचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले ही खारदारकी केवळ १७ महिन्यांची आहे. यातील सहा महिने आचारसंहितेत जाणार आहेत. उर्वरित महिने कामकाज शिकण्यामध्ये धैर्यशील पाटील यांचा वेळ जाणार आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला. पाली येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटनदेखील जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य संभाजी गणपत ढोपे यांचा सेवापूर्ती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला आरडीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे उपस्थित होते. दरम्यान, पेण मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हा विधानसभा मतदारसंघ शेकापक्षाच्या ताब्यात आहे. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे आम्हीही जागा लढवणारच आहोत त्याची तयारी आहे असे देखील जयंत पाटील म्हणाले.