उरण | लाडया गणरायाला गौरीसह १२ सप्टेंबर रोजी विधिवत पूजाअर्चा करीत निरोप देण्यात आला. शनिवारी गणपती आगमन रविवारी दुपारी दीड दिवसाच्या गणराजचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी गौरी आगमन आणि बुधवारी तिचे पूजन आणि आज गुरुवारी विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवा निमित्त अनेक भक्तगण दरवर्षी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करतात. कोणी दीड दिवस, पाच दिवस, तर कोणी दहा दिवसांपर्यंत घरात गणेशाची प्रतिष्ठापना करत असतात. गुरुवारी भाविकांनी विमला तलाव, पिरवाडी समुद्र किनारी व गावोगावी असलेल्या तलावात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करून गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. विसर्जन काळात चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. दिवसभर गणेशभक्तांना दवंडीद्वारे विसर्जनाच्या सूचना वारंवार देण्यात येत होत्या. अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात गणरायाचा विसर्जन सोहळा पार पडला.