श्रीवर्धन | श्रीवर्धन शहरातील वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे वीस ते पंचवीस मिनिटे वाया घालवावी लागत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे श्रीवर्धन बाजारपेठेत तसेच शिवाजी चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांची नेमणूकच करण्यात येत नाही. सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था जिल्हा वाहतूक शाखेकडे आहे.
जिल्हा वाहतूक शाखेकडून श्रीवर्धन शहराच्या वाहतूक नियमनासाठी केवळ एकच पोलीस शिपायाची नेमणूक केलेली आहे. मात्र गणेशोत्सव काळामध्ये याही पोलीस शिपायाला मुंबई गोवा हायवे वरती तैनात करण्यात येते. मात्र अशावेळी शहरातील वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी श्रीवर्धन पोलीस ठाण्याची असून देखील श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडून एकही पोलीस किंवा होमगार्ड श्रीवर्धन बाजारपेठ किंवा शिवाजी चौक या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आला नाही.
संपूर्ण श्रीवर्धन बाजारपेठेमध्ये व वाणी आणि परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फात दुचाकी वेड्यावाकड्या उभ्या केलेल्या आढळून येतात. त्यातच मुंबईहून आलेले चाकरमानी आपली चार चाकी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून खरेदीसाठी दुकानात जात असल्यामुळे वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणावर होते. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी श्रीवर्धन नगरपरिषदेने पेशवे आळी ते बाजारपेठ हा कोपरी रस्ता काँक्रिटीकरण करून नाल्यावरती बांधलेला आहे. सदर रस्त्यावरून दुचाकीस्वार, पादचारी किंवा सायकलस्वारच जाऊ शकतात. परंतु या मार्गावरून रिक्षाचालक, सहा आसनी रिक्षा, चार चाकी वाहने देखील बिन दिक्कतपणे जात असल्याने, या ठिकाणी समोरून वाहन आल्यास दुसरे वाहन मागे घेतल्याशिवाय समोरच्या वाहनाला मार्ग मिळत नाही. तसेच या मार्गावरील दादर पुलासमोरील भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुचाकी, रिक्षा व वाहने पार्क केलेली आढळुन येतात.
वाहतूक कोंडीचे स्वरूप इतके गंभीर असते की, जेष्ठ नागरिक किंवा महिलांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण होऊन बसते. श्रीवर्धन तालुयात गणेशोत्सवानिमित्त अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. परंतु स्थानिक पोलीस ठाण्याकडून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी कोणत्याही प्रकारे पोलिसांची नेमणूक केली जात नसल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत जटिल होऊन बसली आहे. तरी श्रीवर्धन पोलिसांनी मच्छी मार्केट, जुने तहसील कार्यालय व शिवाजी चौक या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.