मुरुडमध्ये गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान तणाव ; दोन लहान मुलांनी दगड भिरकावल्याने वातावरण तंग

14 Sep 2024 10:38:01
 alibag
 
कोर्लई | मुरुड तालुक्यातील भोगेेशर पाखाडातून गौरी गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असताना दोन अल्पवयीन मुलांनी या मिरवणुकीवर दगड भिरकावल्यामुळे मुरुडमध्ये दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर गणेशभक्तांनी मुरुड पोलीस ठाण्याला घेराव घालत, याप्रकरणी कारवाईची मागणी केली.
 
गुरुवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील गणेशभक्तांनी मुरुड पोलीस ठाण्याला घेराव घालून दगडफेक करणार्‍या दोन्ही मुलांना व त्यांच्या पालकांना अटक करण्याची मागणी केली. गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान भोगेेशर पाखाडीत घरघोती गणपती मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत येत असताना ही मिरवणूक जगदीश पाटील यांच्या निवासस्थानी जवळील रस्त्यावर आली असता एका कंपाऊंडमधुन मिरवणूकीमध्ये असणार्‍या गणेशभक्त महिला प्रिता चौलकर यांच्या बाजूने एक दगड आला.
 
तद्नंतर दुसरा दगड वैशाली म्हात्रे यांच्या हाताला लागला. सतत दगड आल्याने गणेशभक्तांनी दगड येणार्‍याकंपाऊंडमध्ये गेट उघडून घुसण्याचा प्रयत्नकेला; परंतू गेटला आतून कडी असल्याने आळीतील मुले कपाऊंडवर चढून गेली असता दोन लहान मुले ही दगडे मारीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना पाहिल्यानंतर ती मुले पळून गेली; परंतु या दगड फेकीत महिला जखमी झाल्या, त्यांना मुका मार लागला आहे, ही बातमी मिळताच तात्काळ मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे व कर्मचारी घटनास्थळी येऊन नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. रात्रभर चर्चा करण्यात आली. अखेर सकाळी येण्याचे आवाहन मुरुड पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आले होते.
 
पोलिसांकडून सकाळपर्यंत कोणतीही कारवाई होत नसल्याने सकाळच्या दरम्यान शेकडो गणेशभक्तांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना घेराव घालून जाब विचारला. जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, भारत माता की जय, जय श्रीरामच्या घोषणांनी पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून गेला. यावेळी अलिबाग विभागीय पोलीस अधिकारी विनित चौधरी यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.अखेर पोलिसांनी तक्रार नोंद घेण्यास सुरुवात केली. तद्नंतर नागरिकांनी शांत राहिले आहे. तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर मुरुड शहरातील व्यापारी वर्गानी दुकाने बंद ठेवली होती. तर पोलिसांनी चोख बदोबस्त तैनात ठेवला होता.
 
Powered By Sangraha 9.0