महाडमध्ये गावाच्या बैठकीमध्ये वाद ; ग्रामस्थांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड, एकावर वार; गुन्हा दाखल

By Raigad Times    16-Sep-2024
Total Views |
 mhad
 
महाड | गावातील मंदिराच्या बांधकामाबाबत गावाची बैठक सुरु असतानाच एकाने गावकर्‍यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच ग्रामस्थांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, धारदार हत्याराने वार केल्याची घटना महाड तालुक्यात घडली. महाड तालुक्यातील पिंपळवाडी वांद्रेकोंड ग्रामस्थांची मिटींग शुक्रवार १३ सप्टेंबर रात्री बोलावण्यात आली होती.
 
गावातील मंदिराच्या बांधकामाचा विषय सुरु असताना, अंकुश गोपाळ पवार यांने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही ग्रामस्थ त्याला समजवण्यासाठी उभे राहिले असता, अंकुश आणि त्याच्यासोबतचे दहा बाराजण ग्रामस्थांच्या अंगावर धावून गेले. धावून गेलेल्यातील लक्ष्मण रामचंद्र शेडगे यांनी सोबत आणलेली मिरची पूड ग्रामस्थांवर टाकली ती पूड फिर्यादीसह रामचंद्र वांद्रे, संतोष वांद्रे व इतर ग्राम स्थांच्या डोळ्यात गेली.
 
याचवेळी संजय रामचंद्र शेडगे व अशोक नारायण पवार यांनी धारदार शस्त्राने प्रवीण सिताराम शेडगे यांच्यावर वार केला. त्यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाली. या घटनेविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.