होरपळलेल्या कामगाराचा मृत्यू ; मॅनेजरवर गुन्हा दाखल करा

By Raigad Times    16-Sep-2024
Total Views |
 panvel
 
रोहा | साधना नायट्रोकेम कंपनीत गुरुवारी सकाळी केमिकल टँकचा भीषण स्फोट होऊन आगीत सहा कामगार होरपळले होते. त्यातील दोन कामगार जागीच ठार झाले तर एकाचा उपचारासाठी नेताना रस्त्यात मृत्यू झाला होता. अन्य तीन कामगार गंभीर जखमी झाले होते. रविवारी सकाळी अनिल मिश्रा या भाजलेल्या चौथ्या कामगाराचा ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
कंपनीतील भीषण आगीच्या दुर्घटनेप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. विशेष म्हणजे साधना नायट्रोकेमचे मालक असित झव्हेरी तसेच प्रोडक्शन मॅनेजर जे.टी. कुट्टी यांच्यावर दोन दिवस उलटूनही कारवाई झालेली नाही. याप्रकरणी हलगर्जीपणा करण्यात आला असून मॅनेजरवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यूुखी पडलेल्या कामगारांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी दिला आहे.
 
बारा तासांत पुन्हा प्लांट सुरु; कामगार संतापले
 
धाटाव एमआयडीसीमधील साधना नायट्रोकेम या कंपनीत गुरुवारी सकाळी केमिकल टँकचा भीषण स्फोट होऊन तीन कामगार ठार तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर बारा तासातच व्यवस्थापनाने ऑर्डरचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी केमिकलचे उत्पादन सुरू केले. ज्या प्लांटमध्ये ही घटना घडली तो प्लांट तब्बल पाच तास चालू होता. कामगारांच्या जीवाशी खेळ केल्याने व्यवस्थापनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
साधना नायट्रोकेम या कंपनीत मिथेनॉल व टोल्यून या सॉल्व्हन्ट बेस केमिकलचे उत्पादन करण्यात येते. सीएफ २ या प्लांटमध्ये गुरुवारी सकाळी सवाअकराच्या सुारास अचानक स्फोट होऊन त्यात संजीत कुमार, दिनेश कुमार व बास्की यादव या तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जे.टी. कुट्टी यांनी संध्याकाळी काही कामगारांना बोलावून तुम्ही कामावर या, आपल्याला ऑर्डरचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्लांट परत सुरू करायचा आहे असे सांगितले. मात्र आधीच घाबरलेल्या कामगारांनी पुन्हा कामावर येण्यास नकार दिला. त्यामुळे मॅनेजरने कंपनीबाहेरील काही कामगारांना घाईने बोलावून रात्री सीएफ २ प्लांट सुरू केला व केमिकलचे उत्पादन पूर्ण केले. कामगारांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार असून या घटनेविरुद्ध संपूर्ण धाटाव एमआयडीसीत चीड निर्माण झाली आहे. या बेफिकीर व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणीही करण्यात येत आहे.