खोपोली | शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला होता. या पक्षप्रवेशाला मला फसवून घेऊन गेल्याचा गौप्यस्फोट बीड खुर्द ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या सदस्या लक्ष्मी पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या खालापूर तालुका मध्यवर्ती कार्यालयात रविवारी, १५ सप्टेंबर रोजी पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना फसवून, आमिष दाखवून पक्षप्रवेश केला जात आहे. कोणाला असे फोन आल्यास मला सांगा, असे सुधाकर घारे यांनी सांगत बीड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या लक्ष्मी पवार यांना फसवून पक्षप्रवेश करवून घेतल्याचे सांगितले.
यावर बोलताना लक्ष्मी पवार यांनी सांगितले की, सुधाकर घारे यांच्या ऑफिसला मिटींगला जायचे आहे, असे सांगून मला घेऊन गेले, गाडी दहिवली रस्त्याकडे वळल्यावर मी विचारले, इकडे कुठे ऑफीस आहे. त्यांनी सांगितले, तिकडेही ऑफीस आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावर वेगळीच माणसे दिसली, मी तेव्हा मनाशी ठरवले, मला फसवून आणले तरी मी माझा राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणार नाही. त्यामुळेच मी पुन्हा राष्ट्रवादीत आल्याचे त्यांनी सांगितले. अगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील कार्यकर्ते फोडण्याचे काम सुरु असल्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.