पनवेल | पनवेल येथील प्रिया नाईक या महिलेच्या हत्येमध्ये तिच्या मुलीचाच हात असल्याचे समोर आले आहे. तिने आईची हत्या करण्यासाठी दहा लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी तिघांना पनवेल पोलिसांनी गजाआड केले आहे.प्रिया नाईक या पनवेल येथे आपल्या कुटुंबासह राहत होत्या.
१३ सप्टेंबर रोजी रात्री प्रिया या बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या पतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; पण डॉटरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात प्रिया यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पनवेल शहर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासाची सूत्रे फिरत फिरत, प्रिया यांच्या मुलीपर्यंत येऊन पोहचली. प्रिया यांची विवाहित मुलगी प्रणाली ही पतीसोबत न पटल्याने पाच वर्षांच्या मुलीसह, दोन वर्षांपासून पनवेल येथे आईकडे राहण्यास आली होती.
पतीला सोडून माहेरी आलेल्या प्रणालीला बाहेर ये-जा करण्यास, फोनवरबोलण्यास बंधने घातली होती. बाहेर गेल्यास सतत फोन करणे, मोबाईलची तपासणी करणे, आईच्या या निर्बंधांना प्रणाली वैतागली होती. आई लादत असलेल्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ती टोकाला येऊन पोहोचली होती. या प्रकरणातील विवेक पाटील हा प्रणालीला बहीण मानत होता.
त्याला पैशांची गरज असल्याने त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. प्रणितालाही आईच्या निर्बंधातून सुटका करून घ्यायची असल्याने तिने विवेकला १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली; मात्र त्याबदल्यात आईची हत्या करण्यास सांगितले. पैशांची गरज असल्याने विवेकने हत्या करण्याची तयारी दर्शवली. यासाठी त्याने मित्र विशाल पांडे याची मदत घेतली आणि १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली.
रात्री प्रिया नाईक यांचे पती घरी आले असता, प्रिया बेशुध्द अवस्थेत आढळून आल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सुनील वाघ, राजेंद्र घेवडेकर, सुषमा पाटील, स्वप्नील केदार, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, परेश म्हात्रे, वाघमारे, वायकर, भोसले, डोईफोडे, शेवाळे, पाटील, सोनवणे, पोलीस नाईक महेश पाटील आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध सुरू केला.
तपासात विवेक आणि विशाल यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे उघड झाले. दोघांची चौकशी केली असता, प्रणालीने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी प्रणितालाही अटक केली. या तिघांना पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. दरम्यान, खालापूर येथे मुलीने आईची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, या प्रकरणातही आईच्या हत्येमध्ये मुलीचाचा हात आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.