माणगाव | हत्या करुन माणगावमध्ये फेकलेल्या तरुणाची ओळख पटविण्यासाठी माणगाव पोलिसांना कसरत करावी लागते आहे. ११ सप्टेंबर रोजी या अज्ञात तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र पाच दिवस उलटले तरी, मृताची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत.
माणगाव पोलिसांनी अज्ञात मृताची ओळख पटविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मृत व्यक्ती २० ते २५ वर्षे वयोगटातील असून, त्याचा रंग सावळा आहे. त्याने अंगात लालसर केशरी रंगाचे गोल गळ्याचे शर्ट व नेव्ही ब्लू रंगाची १०००० असे लिहिलेली पँट घातली असून, उजव्या हातावर इंग्रजीमध्ये ए.पी. अशी अक्षरे लिहून लव्ह शेप गोंदलेले आहे.
उजव्या हातात रुद्राक्ष व मनी दोर, पायात पांढरी चप्पल आहे. या तरुणाची ११ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान हत्या करण्यात आली असून, याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीबाबत जिल्ह्यातील अथवा जिल्हा बाहेरील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिसिंग तक्रार दाखल असल्यास किंवा वरील मृत तरुणाची ओळख पटेल अशी माहिती असेल तर माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे (मो.नं. ९८२२८८३३०६), पोलीस शिपाई प्रवीण माटे (मो. ९५५२१७४३००) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन माणगाव पोलिसांनी केले आहे.