पेण | पेण येथील बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या रावे गावातील योगेश पाटील याची १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली होती.
योगेश पाटील (वय ३१, रा.रावे, पेण) हा जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी पदावर आहे. त्याची पेण येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणीसोबत २०१८ मध्ये फेसबुकद्वारे ओळख झाली होती. ओळखीचे मैत्री आणि नंतर प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून योगेशने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थपित केले. मात्र नंतर लग्न करण्यास नकार दिला. २०१८ पासून हा प्रकार सुरु होता.
एप्रिल २०२२ साली योगेश पाटील याच्या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर तिने योगेशसोबत बोलणे बंद केले होते. मात्र तरीही योगेश वारंवार संपर्क साधून, लग्नाचे खोटे ओशासन देत या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करत होता.
३० ऑगस्ट रोजी योगेशने या तरुणीला वाशी रेल्वे स्टेशन येथे बोलावून शिवीगाळ आणि मारहाण केली आणि तिला वाशी येथे सोडून निघून गेला. त्यानंतर, या तरुणीने ३० ऑगस्ट रोजी पेण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी योगेश पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करत, पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने योगेश पाटीलची १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस करीत आहेत.