बेकरे गावातील सिमेंट बंधार्‍याचा सांडवा फुटला , पाणीप्रश्न उद्भवण्याची भीती, बंधारा दुरुस्तीची मागणी

19 Sep 2024 17:14:10
 karjat
 
कर्जत | कर्जत तालुयातील कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील बेकरे पुलाच्या वरच्या भागात असलेल्या सिमेंट बंधार्‍याचा सांडवा जोरदार पावसाने फुटला आहे. त्यामुळे या बंधार्‍यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना धेाक्यात आल्या आहेत. भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, या बंधार्‍याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
 
कर्जत कल्याण रस्त्यावर बेकरे गावाच्या जवळ पुलावर सिमेंट बंधारा बांधण्यात आला. त्या ठिकाणी पाली भूतीवली लघुपाटबंधारे प्रकल्प असून त्या धरणाच्या पाझर तलावातील पाणी याच बेकरे पुलाच्या खालून वाहणार्‍या नाल्यातुन वाहून जात असते. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनंतर सिमेंट बंधारा बांधण्यात आला.
 
या बंधार्‍यावर या भागातील नळपाणी योजना अवलंबून आहेत. तसेच येथील गणेशघाटावर धार्मिक विधी होत असतात. त्यासाठी पाणी आवश्यक असते. गेल्या काही वर्षात त्या सिमेंट बंधारा हा महत्वाचा ठरला आहे. परंतु मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सिमेंट बंधारा ओसंडून वाहत होता.
 
सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे शेवटी सिमेंट बंधार्‍याचा सांडवा फुटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असून, या भागातील पाण्याचा साठा कमी होत आहे. बेकरे पुलाच्या वरच्या भागात असलेल्या सिमेंट बंधारा येथे या भागातील नळपाणी योजनांचे उद्भव आहेत. त्यामुळे या योजनाही संकटात आल्या आहेत. भविष्यातील पाणी संकट लक्षात घेतला, पाटबंधारे खात्याने या बंधार्‍याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0