तळा | तळा शहरासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या १३ कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या नवीन पाणी योजनेचे काम धिम्या गतीने सुरु आहे. या योजनेचे भूमिपूजन १७ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले होते. याला आठ महिने उलटले, तरी या कामाने आवश्यक गती घेतलेली नाही.
असेच कासवछाप गतीने काम सुरु राहिल्यास, ही योजना वेळेत पूर्ण होईल की नाही? याबाबत शंका नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे. तळा शहरासाठी वावे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत १३ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे कंत्राट वैष्णवी कन्स्ट्रशन बारामती पुणे या कंपनीला दिले असून, मार्च २०२४ रोजी काम सुरू करण्याचे आदेश या कंपनीला शासनाकडून देण्यात आले.
हे काम पूर्ण करण्याचा कालावधी १८ महिन्यांचा आहे. त्यातील आठ महिने निघून गेले आहेत. जेव्हा ठेकेदाराच्या मनात येते तेव्हा तो काम सुरू करतो. हे काम करत असताना कोणते नियोजन, मोजमाप न करता मनमानी पद्धतीने काम केले जात असल्याचा आरोप तळातील नागरिकांमधून होत आहे.
नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाचा इंजिनियर या ठिकाणी फिरकत नसल्यामुळे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. योजनेतील विहीर बांधण्यासाठी इतकी दिरंगाई होत असेल तर उर्वरित काम कधी पूर्ण करणार? असा सवाल उपस्थित केलाजात आहे. नगरपंचायतीत विरोधी पक्ष नसल्याने प्रशासन सुस्त झाले असून, ठेकेदारावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नसून काम रामभरोसे सुरू आहे.
त्यामुळे नगरपंचायतीने रस्त्यासाठी खर्च केलेले ५५ लाख रुपये ज्याप्रमाणे पाण्यात गेले, त्याचप्रमाणे १३ कोटीदेखील पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही योजना फक्त पाणी अडवा पैसे जिरवा यासाठीच आहे की काय? अशी शंका तळेवासी व्यक्त करत आहेत. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा, तळा शहरवासियांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नगरपंचायतीच्या ताब्यात येथील पाणीपुरवठा गेला आणि दुर्दैवाचा फेरा सुरू झाला.
गेल्या वीस-बावीस वर्षापासून एक दिवस आड पाणी मिळते. उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याच्या नावाने बोंबच असते. विशेष म्हणजे पाणीपट्टी वाढवून कुठल्याच प्रकारच्या सुविधा नागरिकांना दिलेल्या नाहीत. आजही काही परिसरातील भागात तीन-चार दिवसानंतर पाणी येते, तेही पुरेसे नसते. पाणी समस्या असल्यामुळे शासकीय निमशासकीय अधिकारी यामध्ये शिक्षक वर्ग ग्रामसेवक, तलाठी, इतर कर्मचारी इंदापूर माणगावसारख्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या सर्व चाकरमान्यांची आर्थिक उलाढाल इतर तालुयात होत असल्याने तळा बाजारपेठेवर त्याचा मोठा फटका बसत आहे.