अलिबाग | काँग्रेसचे सरकार आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करू असे म्हणणारे काँग्रेस आमदार सुनील केदार यांचा गुरुवारी अलिबाग येथे शिवसेना शिंदे गटातर्फे निषेध करण्यात आला. अलिबाग एसटी स्टँडसमोर शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जिल्हाप्रमुख राजा केणी आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुख संजीवनी नाईक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आमदार केदार यांच्या विरोधात निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली. आमदार सुनील केदार यांच्या निषेधाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. शिवसेना नेत्या मानसी दळवी यांनी आमदार केदार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. जर सरकारने जनतेच्या पैशातून मिळालेल्या करातून राज्यातील महिलांसाठी एखादी योजना राबवली तर तुच्या पोटात का दुखते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संजीवनी नाईक यांनी लाडकी बहीण योजनेचा ग्रामीण भागातील गोरगरीब भगिनींना मोठा आधार असल्याचे उदाहरणासह पटवून दिले. गावखेड्यात जेथे शेतीवरच जीवन अवलंबून आहे आणि शेती केवळ निसर्गावर आहे अशावेळी दरमहा मिळणारे दीड हजार रूपये खूप मोलाचे आहेत. महिला सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वाची आहे.
एसी गाडयांध्ये फिरून तुम्ही या योजनेवर बोलू नका असा टोला संजीवनी नाईक यांनी केदार यांना लगावला. अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी, दीपक रानवडे, जीवन पाटील, अर्जुन पाटील, बुंदके आदींसह शिवसेना महिला आघाडी, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.