४० हजारांची लाच घेताना रा.जि.प शिक्षण विभाग समन्वयकाला अटक

20 Sep 2024 19:07:39
 khopoli
 
खोपोली | शिक्षकांचा तीन महिण्याचा थकीत पगार काढून देण्यासाठी ४० हजारांची लाच मागणार्‍या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या समन्वयकाला खालापूरात बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे. या घटनेने जि.प.शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
 
पनवेल पंचायत समितीच्या अंतर्गत येणारी प्राथमिक शाळा जाताडे,ता.पनवेल,जि.रायगड या शाळेतील उपशिक्षक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या समन्वयक अमित राजेश पंड्या (वय वर्ष ४७ ) यांनी तक्रारदार तीन शिक्षकांकडून यांच्याकडून माहे जून, जुलै २०२४ या कालावधीचे वेतन काढून देण्यासाठी ४० हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती.
 
तक्रारदार शिक्षकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देत प्राथमिक शिक्षण विभागाच्या समन्वयका विरोधात तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारी नुसार पडताळणी करण्यात आली. पैसे स्वीकारण्याची तारीख ४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजताची पनवेल एस.टी.स्टॅन्ड येथे ठरली मात्र पंड्या यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्विकरण्यास नकार दिल्याने सदरचा सापळा यशस्वी झाला नाही.
 
तक्रारदार शिक्षकांनी पुन्हा विनंती करून पंड्या यांना आपले रखडलेले मानधन काढण्यासाठी विनंती केली असता त्यांनी पुन्हा लाच मागितली आणि ठिकाण खालापूर फाटा ठरला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना खालापूर तालुयातील खालापूर फाटा येथे तक्रारदार यांचेकडून लाच घेतांना रंगेहात पकडले आहे.सदरची कारवाई लाचलुचपत विभाग ठाणे पोलिस अधिक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलिस अधिक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0