आ. संजय शिरसाट यांनी सिडकोचा पदभार स्वीकारला

By Raigad Times    20-Sep-2024
Total Views |
 new panvel
 
नवी मुंबई | शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी (१९ सप्टेंबर) सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याची प्रतिक्रिया यांनतर संजय शिरसाट व्यक्त केली.
 
राज्याच्या विकासामध्ये सिडकोने आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नगर नियोजन व विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहर, महागृहनिर्माण योजना इ. महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असणार अशी प्रतिक्रीया यानंतर शिरसाट यांनी व्यक्त केली.
 
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासही आपले प्राधान्य असणार आहे. सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, उपस्थित होते.
 
आदित्य ठाकरेंची जोरदार टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या गटातील काही आमदार मंत्रिपदासाठी आग्रही होते. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी तर कोट शिवून ठेवल्याचे जाहीर सांगितले होते. मात्र २०२३ रोजी अजित पवार यांच्या गटाला सत्तेत सामावून घेतल्यामुळे त्यांच्या आमदारांना मंत्रीपदं दिली गेली.
 
ज्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील निष्ठावंतांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. अखेर निवडणुकीच्या तोंडावर काही जणांची वर्णी महामंडळावर लावली गेली. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.