उद्योगधंदे महाराष्ट्रातच राहणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

श्रीवर्धनमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा

By Raigad Times    21-Sep-2024
Total Views |
जन सन्मान यात्रा 
 
श्रीवर्धन : महाराष्ट्रातून गुंतवणुक बाहेर गेल्याचं सांगत विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. मात्र महाराष्ट्रातून उद्योग महाराष्ट्रातच राहणार, असा पुनरुच्चार करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेतील हवाच काढून टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘जन सन्मान यात्रा’ आज श्रीवर्धन आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात पार पडली आहे. यावेळी ते बोलत होते.
 
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, श्रीवर्धनच्या आमदार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हेही यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत होते. अजित पवार यांनी हरिहरेश्वर मंदिरात पूजाही केली.
 
त्यानंतर श्रीवर्धन येथील नाना राऊत विद्यालयात महिलांच्या मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, तुम्ही महायुती आणि राष्ट्रवादीला का पाठिंबा द्यावा हे सांगण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. शेषराव वानखेडे यांच्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सर्वाधिक सादर करण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे.
 
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील महिलांना अधिकाधिक स्वावलंबी बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्याबाबत मी आणि आदिती तटकरे यांनी सुरुवातीला चर्चा केली होती. पवारांनी "माझी लाडकी बहीण" योजनेचा लाभ घेत राख्या बनवून २० हजार रुपये कमावणाऱ्या महिलेची गोष्ट सांगितली आहे.
 
सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत. ज्यात ३ मोफत गॅस सिलिंडर, लेक लाडकी योजना, पींक ई-रिक्षा योजना, बळीराजा वीज सवलत योजना आणि युवा कार्य प्रशिक्षण योजना यांचा समावेश आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचंही अजित पवारांनी यावेळी सांगितले.
 
महायुतीबद्दल बोलताना "भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करु शकतात, परंतु महायुती म्हणून आम्ही प्रभावीपणे सहकार्य करण्यासाठी एकत्रित कार्यक्रम आयोजित करत आहोत, असे अजित पवार म्हणाले. कुलकर्णी हॉल, श्रीवर्धन येथे हॉटेल मालकांसमवेत झालेल्या कार्यक्रमात नवीन पर्यटन धोरणामुळे पर्यटन क्षेत्रात शाश्वत वाढ होईल आणि 18 लाख रोजगार निर्माण होतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज १२०० सायकलींचे वाटप केले आहे, तर अदिती तटकरे १० हजार सायकलींचं मतदारसंघात वाटप करणार आहेत. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना “अदितीने सेवेच्या बाबतीत तिच्या वडिलांना मागे टाकले आहे. ती तुमची बहीण आणि मुलगी आहे, तिला पाठिंबा द्या”, असे अजित पवार म्हणाले.
 
आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना, अजित पवार यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जवळपास १.६ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सप्टेंबरपर्यंत, सुमारे २.४५ कोटी नोंदणी पूर्ण झाल्या आहेत, ज्यामुळे आम्ही नजीकच्या काळात २.५० कोटी महिलांना लाभ देण्याचं लक्ष गाठणार आहोत. श्रीवर्धन मतदारसंघात जवळपास ७५ हजार महिलांनी नोंदणी केली असून ७०-७५% आधीच योजनेचा लाभ घेत आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या परिवर्तनकारी योजना आणल्या आहेत, १० वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव मंत्री आहेत. ते पुढे म्हणाले, "विरोधकांनी विविध कल्याणकारी योजनांवर टीका केली असेल, परंतु विरोधक टीका करण्यातही अपयशी ठरले आहेत, कारण लोकांनी या उपक्रमांना स्वीकारलं आणि लोकप्रियही केलं."
 
जनसन्मान यात्रेमुळे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या राज्यातील निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असून प्रचारात आघाडीवर असल्याचं चित्र आहे. ८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्यामुळे अजित पवार गटात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करत आहे. यात्रेदरम्यान अजित पवार महिला, तरुण आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.