दिघी-महामार्ग भूसंपादन मोबदला रखडला , महामार्ग बंद करु, शेतकर्‍यांचा रास्ता रोकोचा इशारा

By Raigad Times    10-Jan-2025
Total Views |
 dighi
 
दिघी | रायगड जिल्ह्यातील राजपुरी खाडीवर विकसित होत असलेल्या दिघी पोर्टला दिघी-पुणे महामार्ग म्हसळा तालुक्यातील सकलप आणि तोंडसुर या बायपास मार्गावरुन काढण्यात आला आहे. मात्र, रस्ता पूर्ण होऊन अद्याप मोबदला न मिळाल्याने बाधित शेतकर्‍यांनी आक्रमक पावित्रा घेत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
दिघी पोर्टकडून होणारी अवजड वाहतूक ही म्हसळा शहरातून होत असताना, पर्याय म्हणून पोर्ट प्रशासनाने वाहतूक सोयीसाठी तोंडसुरे ते श्रीवर्धन मार्गाला जोडण्याचा बायपास मार्ग बनवण्याचा आराखडा तयार केला. जमिनी अधिग्रहण करण्याचे काम होऊन २०१९ मध्ये रस्त्याचे कामही सुरु केले. दोन वर्षांत रस्ता पूर्ण होऊन बायपास मार्ग सुरू करण्यात आला.
 
या रस्यासाठी सकलप व म्हसळा येथील बावीस शेतकर्‍यांची साधारण ५८ गुंठे जमीन गेली आहे. त्यातील जवळपास आठ शेतकर्‍यांची गुंठे जमीन अधिग्रहण होऊन त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यावेळी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत करताना तीन महिन्यात जमिनीचा मोबदला देण्याचे सांगितले होते; मात्र रस्त्याचे काम पूर्ण आणि रस्ता सुरळीत गेली सहा वर्षे जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून अधिकार्‍यांच्या मागे पाठपुरावा करत आहे.
 
मात्र, अद्याप एक दमडी मिळाली नाही, अशी प्रतिक्रिया बाधित संतोष काते यानी दिली आहे. दरम्यान, येत्या पंधरा दिवसांत आमच्या जमिनीचा मोबदला मिळाली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.