पेण | पेणचा पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला असून १६० वाड्या आणि ३६ गावांना जवळपास १ कोटी ८९ लाख ५० हजार रुपयांचा पाणीपुरवठा आराखडा तयार करुन तो रायगड अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला तालुक्यातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठलवाडी, बोर्झे लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, कान्होंबा या गावांसह येथील अनेक वाड्या वस्त्या.गेले कित्येक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.
त्यामुळे राज्य सरकारने या विभागासाठी हजारो कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला असता तरी आजतागायत या भागाला पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. यावर्षी खारेपाट विभागासाठी पेण पंचायत समिती प्रशासनाकडून २०२४- २०२५ करीता १६० वाड्या आणि ३६ गावांना टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा तसेच विहिरी दुरुस्ती करणे यासह इतर कामांकरीता पंचायत समिती प्रशासनाकडून १ कोटी ८९ लाख ५० हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
सदर आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून आराखड्याला मंजुरी या भागात आणि इतर टंचाईग्रस्त असणार्या गावांना लागलीच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पेण पंचायत समितीकडून देण्यात आली आहे.
पेण खारेपाटाच्या टंचाईग्रस्त गावांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एक कोटी ८९ लाख ५० हजारांचा पाणीपुरवठा आराखडा तयार करून वरिष्ठ जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आहे. - सूर्यकांत परब, सहाय्यक अभियंता, पंचायत समिती पेण
खारेपाटाच्या टंचाईग्रस्त गावांसाठी पाणीपुरवठा आराखडा तयार करण्यात येतो. मात्र टँकरद्वारे येणारा पाणीपुरवठा किती नागरिकांपर्यंत पोहचतो हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे आराखडे तयार होतात मात्र येथील जनतेची तहान कायमस्वरूपी कधी भागणार याचीच उत्कंठा लागून राहिली आहे.. - विनोद म्हात्रे, जिल्हा शिवसेना, वढाव-पेण