भारतवीर शहीद सुयोग कांबळे यांना लष्कराकडून मानवंदना

13 Jan 2025 12:36:15
alibag
 
अलिबाग | ‘तो येईल’ या आशेवर वीरपूत्र सुयोग कांबळे यांच्या माता-पित्याने सव्वा वर्ष काढले...शोकाकूल वीरपत्नी, वीरपूत्र, नातेवाईक, मित्रपरिवाराला वाटत होते... आता तर तो ‘गेट टुगेदर’ करुन गेलाय... परत येतो म्हणाला होता...असे कसे होईल..? झर्‍यासारखा खळखळणारा सुयोग आपल्यात नाही, कल्पना त्यांना करवत नव्हती; पण भारतीय सैन्य दलाने त्याला ‘शहीद’ म्हणून घोषित केले आणि अलिबागसह खारेपाट गहवरुन गेला...रविवारी सैन्यदलाने मानवंदना दिली.
 
त्यांच्या वस्तू कुटुंबियांना परत केल्या...तेव्हा सर्वांचाच बांध फुटला...हुंदके फुटू लागले...डोळ्यातून धारा वाहू लागल्या...‘सोन्या, माझ्या राजा, कुठे गेलास तू? ...वीरमाता, वीरपत्नीचे हे दुःख पाहवत नव्हते... अलिबाग तालुक्यातील नारंगी बौद्धवाडीतील सुयोग भारती अशोक कांबळे. चिंचवली या छोट्याशा गावातील सुयोग कांबळे यांनी देशाच्या सुरक्षेसाठी काम करण्याचा निश्चय केला. अलिबागमधील जेएसएम कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एप्रिल २००५ साली भारतीय सैन्यात भरती झाले. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते ‘स्नो लेपर्ड’ येथे सर्व्हिस करत होते.
 
alibag
 
३ ऑक्टोबर २०२३ रोजी ते गस्त आटोपून आपल्या परत असताना, रात्री तिस्ता नदीच्या किनार्‍यावर असलेल्या कॅम्पमध्ये थांबले होते. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तेथे ढगफुटी झाली. अचानक झालेल्या या ढगफुटीमुळे बाग डोंगरावर असलेले धरण फुटले. त्यामुळे तिस्ता नदीला महापूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी १० ते २० फुटांनी वाढली. या महापुरात जवानांच्या एका तुकडीसह शेकडो नागरिक वाहून गेले. जवान सुयोग कांबळे यांचादेखील समावेश होता.
 
४ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास, भारतीय सैन्याने या घटनेची माहिती दुरध्वनीवरुन जवान सुयोग कांबळे यांच्या कुटुंबियांना दिली. या दुर्घटनेनंतरही जवळपास तीन महिने भारतीय सैन्याने त्यांचा शोध घेतला. या मोहिमेत काहींचे मृतदेह सापडले तर अनेकजण बेपत्ता होते. जवान सुयोग कांबळे यांचा मृतदेह सापडला नव्हता. ते कुठून तरी येतील? अशी आशा पत्नी निशा कांबळे व पूत्र आयुष कांबळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना होती. काही तरी चमत्कार व्हावा, अशी भावना मित्रपरिवाराची होती. परंतू आता सव्वा वर्ष उलटले होते.
 
alibag
 
भारतीय सैन्याकडून जवान सुयोग कांबळे यांना शहीद घोषित करण्यात आले. रविवारी, १२ जानेवारी रोजी भारतीय एक सैन्याची तुकडी, सुयोग कांबळे यांच्या वस्तू कुटुंबियांना परत करण्यासाठी तसेच मानवंदना देण्यासाठी जन्मगाव असलेल्या नारंगी बौद्धवाडी येथे आली होती. भारतीय जवानांकडून सशस्त्र सलामी देण्यात आली. मानवंदना देण्याचा प्रसंग, सव्वा वर्षे आशेवर असणार्‍या कांबळे परिवाराला, आपला ‘राजा’ गेल्याची जाणीव करुन देणारा ठरला.
 
यावेळी उपस्थित अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला.शहीद सुयोग कांबळे यांना मानवंदना भारतीय सैन्यदल दाखल झाले, तेव्हा नागरिकांनी कार्लेखिंड ते नारंगीपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. त्यावेळी शहीद जवान अमर रहे...भारत माता की जय ...अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. हातात तिरंगा घेऊन रस्त्याच्या दुतर्फा अभिवादन करण्यासाठी नागरिक उभे होते.
 
alibag
 
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार पाटील, माजी सभापती अ‍ॅड. आस्वाद पाटील, दिलीप भोईर, चिंचवलीच्या सरपंच कुंदा गावंड, अमित नाईक आदींनी शहीद सुयोग कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र वाहिले. यावेळी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद सुयोग कांबळे यांचे खारेपाटात सुयोग्य स्मारक उभे केले जाईल, अशी घोषणा महेंद्र दळवी यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.जीविता पाटील यांनी केले.

alibag
 
जवान सुयोग कांबळे यांच्याविषयी...
* त्यांचे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्हा परिषद शाळा पिगोंडे रोहा येथे झाले. माध्यमिक शिक्षण हे सुधागड माध्यमिक विद्यामंदीर फोफेरी तर महाविद्यालयीन शिक्षण जेएसएम कॉलेज येथे झाले होते.
* एप्रिल २००५ साली ते भारतीय सैन्यात
* २००५ ते २००७ मध्ये मध्यप्रदेश येथे ट्रेनिंग.
* २००७ ते २००८ मध्ये सियाचीन देसर येथे पहिली पोस्टींग
* २००८ ते २००९ रक्षक लाईन पोस्ट येथे दुसरी पोस्टींग.
* २००९ ते २०१२ साली ते दिल्ली येथे पोस्टींग.
* २०१२ ते २०१५ आसाम चायना बॉर्डर येथे पोस्टींग झाली. येथे त्यांनी मेडल प्राप्त केले.
* २०१५ ते २०१७ या काळात त्यांनी २४ टास्क फोर्समध्ये काम केले.
* २०१८ ते २०२० मध्ये आवेरी पट्टी चायना बॉर्डर येथे शिवा, जाफरान, स्नो लेपर्ड या आऊटपोस्टवर काम केले. येथेही त्यांनी युनिट मेडल प्राप्त केले.
* मार्च २०२२ ते एप्रिल २०२३ साली त्यांनी साऊथ आफ्रीका
इंटरनॅशनल मिशन म्हणून काम केले. मे २०२३ ते ऑक्टोबर २०२३ त्यांची स्नो लेपर्ड येथे पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0