कारची दुचाकीला धडक; दोन तरुणींचा मृत्यूफ , नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील दुर्घटना

14 Jan 2025 13:34:13
 new mumbai
 
नवी मुंबई | दोन अवजड वाहनांच्या मधून दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरुन दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (१३ जानेवारी) दोन तरुणींचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन तरुणी सेंटरवरुन रात्रपाळी करून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यात एकीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या तरुणीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
 
संस्कृती खोकले (वय २२, रा. कामोठे) व अंजली पांडे (वय १९ रा.बोनकोडे, कोपरखैरणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणींची नावे आहेत. सोमवारी सकाळी पावणेसातच्या दरम्यान रात्रपाळी अंजलीला बोनकोडे गावात सोडण्यास संस्कृती येत होती. बोनकोडेजवळ असणार्‍या वीरशैव स्मशान भूमीनजिक समोरून येणार्‍या भरधाव कारनेत्यांना धडक दिली. अपघात झाल्यावर कारचालक त्यांची मदत न करता निघून गेला.
 
यात दुचाकीचालक संस्कृती जागीच ठार झाली तर अंजलीला आसपासच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार तरुणी विरुद्ध दिशेने स्कूटर चालवत होत्या. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय उपाळे पुढील तपास करीत आहेत. बोनकोडे गावाकडे जाणार्‍या पाम बीच रोडवरस्कोडा कारने या तरुणींच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात मरण पावलेली संस्कृती कामोठे सेक्टर १८ मधील रहिवासी होती.
 
तर, अंजली कोपरखैरणेमधील बोनकोडे गावात राहत होती. तुर्भे एमआयडीसीमध्ये रात्रीची संपवून या दोघी घरी जात होत्या. संस्कृती अंजलीला तिच्या घरी सोडून कामोठेला जाणार होती. मात्र, अंजलीला बोनकोडेला सोडण्यासाठी निघालेली संस्कृती.पाम बीच रोडवर विरुद्ध मार्गावरून स्कूटर चालवत होती. त्याचवेळी एका स्कोडा कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात दोघी ठार झाल्या.
 
दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, स्कोडा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. आम्ही त्या कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारचा नंबर व त्या चालकाला शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत, असे एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) व १०६ अंतर्गत गुन्हा दाखल आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0