आंबेडकरी आई शीलादेवी रोकड

14 Jan 2025 18:30:36
lekh
 
मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात शूर,धाडसी शीलादेवी नावाच्या महिलेने स्वतःच्या संसाराची पर्वा न करता बाबासाहेबांच्या श्रद्धेपोटी स्वतः ला झोकून दिले होते. चौदा दिवस ‘राजकैदी’ म्हणून तुरुंगवास भोगला. आज १४ जानेवारी मराठवाडा विद्यापीठाचा ३१ वा नामविस्तार दिन त्यानिमित्ताने मराठवाडा विद्यापीठालाडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी सतत पंधरा वर्षे चाललेला समतेचा संघर्ष आंबेडकरी चळवळीच्या अपूर्वच म्हणावा लागेल.
 
कारण या चळवळीत हजारो आंबेडकरप्रेमी आबालवृद्ध, स्त्री-पुरुष आणि तरुण-तरुणी स्वयंस्ूर्तीने सहभागी झाले होते. अनेकांनी आपल्या जीवनाचे बलिदान करून या चळवळीला गतिमान केले. त्यात राहुरी जि. नगरची आंबेडकरी आई शीलादेवी रोकडे यांचेही नाव अत्यंत भूषणावह आणि गौरवशाली असेच आहे. शीलादेवी यांनी दिलेला प्रखर लढा, भोगलेल्या हालअपेष्टा आजच्या प्रेरणादायी अशाच आहेत.
 
शीलादेवी या राहुरी नगरचे माजी पोलिस अधिकारी (एपीआय) दादासाहेब रोकडे यांच्या पत्नी. नाशिकचे अंकुशरूपवते यांच्या सुकन्या असलेल्या शीलादेवीचा विवाह दादासाहेबांसोबत झाला. दोघेही धार्मिक वृत्तीचे. दादासाहेबांनी सरकारी सेवेत पोलिस पदावर राहून ३६ वर्षे धम्माची, आंबेडकरी चळवळीची मोठ्या निष्ठेने सेवा केली. पतीच्याच खांद्याला खांदा लावून पत्नी शीलादेवीनेही स्वतःला वाहून घेतले.
 
धम्माप्रती असलेला श्रद्धाभावपाहून दादासाहेबांनी शील संपन्नतेची देवी म्हणून पत्नीचे ‘शीलादेवी’ असे सुरेख नाव ठेवले. शीलादेवी यांचे खरे नाव विठाबाई होते. त्यांच्या संसारवेलीवर कल्पना, वंदना, भावना, श्रीहर्ष, संचिता, तथागत, पंचरत्ना आणि संघमित्रा अशी आठ फुले उमलली. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे जो प्राशन करेल जो अन्याय करणार्‍यावर राहणार नाही’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे.
 
बाबासाहेबांचा तोच आदर्श समोर ठेवून शीलादेवीने शिक्षणाचे महत्त्व जाणले. स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण दिले. पती कर्तव्यावर असताना मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतली. न थकता त्या मुलांचा अभ्यास घ्यायच्या. स्वतः अर्धपोटी राहून मुलांचा उत्तमप्रकारे सांभाळ केला. तीन लुगडे एकत्र करून अंगावर पांघरले. मात्र कधीही कमी पडू दिले नाही. त्याच सुमारास रिपब्लिकन नेते दादासाहेब रुपवते यांनी नगरला ‘बहुजन शिक्षण संस्था’ स्थापन केली होती. आर्थिक अडचणीमुळे मुलांच्या खाण्यापिण्याची गैरसोय व्हायची. मुलांचे होणारे हाल पाहून शीलादेवी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेल्या.
 
त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली. एवढेच नव्हे तर स्वतःच्या पदराचे पैसे खर्च करून त्यांनी संस्था चालविली. मुलांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत केली. त्यातील काही मुले पुढे चालून सरकारी नोकरीत उच्च पदावर पोहोचले. ते केवळ दादासाहेब आणि शीलादेवीच्या पुण्याईमुळे! अशा या शीलसंपन्न बाणेदार आंबेडकरी आईचा मराठवाडा नामांतर आंदोलनाच्या महालढ्यात सहभाग होता. पुण्याच्या येरवडा तुरुंगात त्यांनी १४ दिवस ‘राजकैदी’ म्हणून तुरुंगवास भोगला. राजकैदी म्हणून तुरुंगवास भोगताना त्यांनी लाठ्या-काठ्या त्यांच्या जेवणाची प्रचंड आबाळ होऊ लागली.
 
त्यांना तुरुंगात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळायचे. तेव्हा त्यांनी न घाबरता ‘बाबासाहेब आंबेडकर की जय’ म्हणत डरकाळी फोडली. ‘आम्ही क्रिमिनल कैदी नसून राजकीय कैदी आहोत. आम्हाला चांगले जेवण वाढा.’ तुरुंगवास भोगणार्‍या शीलादेवी नगर जिल्ह्यातील एकमेव झुंजार आंबेडकरी आई ठरल्या. ६ डिसेंबर १९७९ रोजी त्यांची सुटका झाली. तत्पूर्वी १९५० साली मराठवाड्यातील दीन-दलित जनतेला शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
 
मराठवाड्याच्या ओसाड माळरानावर बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाच्या रूपाने शिक्षणाचा वटवृक्ष लावला. त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने १९ जुलै १९७८ रोजी मंजूर केला होता. तमाम महाराष्ट्राला मनस्वी आनंद असा दिवस पंधरा वर्षानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी उगवला. विद्यापीठाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले.
 
ज्या दिवशी नामविस्ताराची घोषणातत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली त्या दिवशी शीलादेवीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या डोळ्यातून झरझरा अश्रू ओघळले. आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे त्यांना मनस्वी समाधान लाभले. घरावर पंचशील ध्वज लावला. रंगरंगोटी करून नामविस्ताराचा सुवर्णदिन मोठ्या उत्साहाने समाजबांधवांसोबत साजरा केला. मुलांना गोडधोड, पुरणपोळ्या बनवून वाढल्या.
 
‘बाबांची’ आठवण काढीत सुवासिक फुले वाहून भक्तिभावे पूजाअर्चा केली. शीलादेवीचे अभिवादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाला, लोकशाहीला, समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाला! हे अभिवादन होते प्रज्ञा, शील व करुणेला, ‘शिका’ संघटित व्हा व संघर्ष या बाबासाहेबांनीच दिलेल्या मूलमंत्राला!हे अभिवादन होते. नामांतरासाठी बळी गेलेल्यांना, सतत १५ वर्षे चाललेल्या चळवळीला होते.
 
यातच हा प्रश्न किती श्रद्धेचा होता आणि नामविस्ताराची तहान किती प्रकर्षाने लागली होती याची कल्पना आल्यावाचून राहात नाही. शीलादेवी रोकडे ही निष्ठावान आंबेडकरी आई आज शरीराने थकली असली तरी मनाने अगदी तरुण आहे. महामानवावर श्रद्धा त्यांना गप्प बसू देत नाही. वाचनाची त्यांना भारी हौस आहे. नियमितपणे त्या संपूर्ण वर्तमानपत्र वाचून काढतात. अनेक उत्तमोत्तम ग्रंथाचे वाचन करतात.
 
ग्रंथासाठी त्यांनी स्वतः चे स्वतंत्र ग्रंथालय निर्माण केले आहे.राहुरी स्टेशन रोडवर गुरू-शिष्याच्या शिकवणुकीला अनुसरून ‘भीमुले’ नावाने आलिशान घरकुल आणि सांची स्तुपासारखे प्रवेशद्वार उभारले. बौद्ध धम्मात होऊन गेलेल्या दानवीरांसारखे आचरण करून भिखूसंघाची आजतागायत निष्ठेने सेवा वाहिली. वेळोवेळी भिखूंना भोजनदान, चीवरदान करून दानाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. शीलादेवी रोकडे या मायमाऊलीने १ जानेवारी २०२५ रोजी वयाच्या ८६व्या वर्षात पदार्पण केले आहे. दीर्घायुष्यासाठी मंगलकामना. नामविस्तार दिनाच्या आभाळभर शुभेच्छा...
मिलिंद मानकर,
नागपूर मो. ८०८०३३५०९६
Powered By Sangraha 9.0