सिडकोची घरे स्वस्त होणार , सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले संकेत

14 Jan 2025 12:51:11
 mumbai
 
नवी मुंबई | सिडको तर्फे पनवेल, नवी मुंबई परिसरात घरांची बंधणी करुन त्यांची कमी किमतीत विक्री केली जाते. ‘सामान्यांना परवडतील अशी घरे’ बांधून ती सिडकोमार्फत विकली जातात. गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या घरांची विक्री करण्याची प्रक्रिया चालू झाली मात्र सिडकोची घरे फारच महाग आहेत, अशी तक्रार सामान्यांकडून केली जात होती.
 
त्यावर आता सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी आगामी काळात सिडकोची घरे स्वस्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीकडे बोलताना याबाबतची माहिती दिली. संजय शिरसाट सध्या सिडकोचे अध्यक्ष आहेत.
 
सिडकोची महागडी घरे आणि त्याबाबत लोकांची तक्रार याविषयी त्यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना त्यांनी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यात येतील, असे संकेत दिले आहेत. तसेच मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये, यासाठी सिडकोच्या जाचक अटी शिथील करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रहिवासी प्रमाणपत्राची अट काढून टाकण्याचे संकेत
सिडकोच्या घरांच्या प्रक्रियेतही बरेच महत्त्वाचे बदल करण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. एका कुंटूंबात याआधी सिडकोचे घर असले तरी परत एकदा संबंधित कुटुंबाला दुसरे घर घेता यावे यासाठी अटीत बदल केले जातील, असे शिरसाट यांनी सांगितले. म्हणजेच हा बदल प्रत्यक्षात आला तर एकाच घरात सिडकोची एकापेक्षा अधिक घरे विकत घेता येतील.
 
यासह घरांच्या खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्राची अटदेखील काढून टाकण्यावर विचार केला जाईल, असेही शिरसाट यांनी सांगितले. यासह सिडकोच्या लॉटरीमध्येही मुदतवाढ देणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.
नोंदणी करण्याची मुदत संपली
दरम्यान, सिडको नवी मुंबई परिसरात एकूण ६७ हजार घरे निर्माण करणार आहे. त्यातील २६ हजार घरांच्या विक्रीची प्रक्रिया सध्या आहे. त्यासाठी ‘माझ्या पसंतीचे सिडको घर योजना’ ही योजना राबवली जात आहे. सिडकोचे घर घेण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत १० जानेवारीला संपली असून, आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Powered By Sangraha 9.0